सुरेश धसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले कृषी संचालक विनय आवटे कोण? धनंजय मुंडेंशी नातं काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Suresh Dhas On Vinay Awate : पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे.
मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे. या घोटाळ्यात कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी, विमा कंपन्या आणि विनय आवटे नावाच्या व्यक्तीने संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा दावा धस यांनी केला आहे. शेतकऱ्यांना विमा न मिळवता काही खासगी लोकांनी त्यातून व्याजाचे उत्पन्न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोण आहे विनय आवटे?
विनय आवटे हे कृषी संचालक आहेत. गेल्या 20 वर्षांपासून या खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या ते मुख्य सांख्यिकी पदावर असून इतर महत्त्वाच्या भूमिकाही ते सांभाळतात. धस यांनी आरोप केला की, विनय आवटे यांनी खासगी गुंतवणुकीतून कमाई केली, मात्र पीडित शेतकऱ्यांना विमा मिळालाच नाही. याप्रकरणी कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी आणि कृषी सचिवालयातील व्यक्तीही त्यांना मदत करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
advertisement
धस यांचे आरोप काय आहेत?
आमदार सुरेश धस म्हणाले, “विनय आवटे हे गेल्या दोन दशकांपासून कृषी मंत्रालयात वावरत आहेत. ते खासगी विमा कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी योजना रचतात आणि काही कृषी अधिकारी त्यांच्यासोबत आहेत. स्कायमेटसारख्या संस्थांच्या माध्यमातून जबरदस्त पैसे वसूल होत आहेत. शेतकऱ्यांना विमा मिळावा म्हणून बनवलेल्या योजनेचा विपर्यास होतोय. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
advertisement
धनंजय मुंडेंवर आरोप
धस यांनी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यांनी स्पष्टपणे नाव न घेता सांगितले, "एक रुपयांत पीक विमा योजना कोणाच्या काळात आली ते पाहा. 2021 नंतर जे काही घडले त्यावर लक्ष द्या." बीडसह वर्धा, नागपूर, अमरावती आणि जालना जिल्ह्यांत सरकारी, गायरान व वनखात्याच्या जमिनींवरही खोट्या नावाने पीक विमा भरल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
चौकशी प्रमुखही आरोपित?
या घोटाळ्यांमध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कापूस, सोयाबीन, नॅनो युरिया यांसारख्या अनेक शेतीसंबंधित घोटाळ्यांमध्ये विनय आवटे यांच्यावर संशय असूनही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमल्याचा आरोप धस यांनी केला.
राजकीय वर्तुळात खळबळ
view commentsया आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीसाठी स्वतंत्र समितीची मागणी केली आहे. तर सरकारकडून या आरोपांवर अद्याप स्पष्ट उत्तर आलेले नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असा सूर राज्यभरातून उमटू लागला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सुरेश धसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले कृषी संचालक विनय आवटे कोण? धनंजय मुंडेंशी नातं काय?


