कृषी पंपापासून ते पीव्हीसी पाईपपर्यंत! अमेरिका-इराणच्या युद्धमुळे सिंचन साहित्याचे दर कडाडले, कोणत्या वस्तूला किती भाव?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
America-Iran War : इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून त्याचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रांवर दिसू लागला आहे.
मुंबई : इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून त्याचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रांवर दिसू लागला आहे. आखाती प्रदेशातील या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचा थेट फटका शेती क्षेत्रालाही बसू लागला आहे. विशेषतः सिंचनासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कच्चे तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळणाऱ्या काही घटकांपासून सिंचनासाठी वापरले जाणारे पीव्हीसी पाईप, ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य तयार केले जाते. सध्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे या साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन यंत्रणा, पीव्हीसी पाईप, मोटार पंप तसेच मोटार पंपासाठी लागणाऱ्या केबल्स यांच्या किमतीत सुमारे ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
advertisement
उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची अडचण
उन्हाळी हंगामासाठी अनेक शेतकरी आधीच सिंचनाची तयारी करत असतात. मात्र अचानक झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. सिंचन साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांना आता अतिरिक्त १५ ते २० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सिंचन साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ
युद्धापूर्वी आणि सध्याच्या किमतींमध्ये लक्षणीय फरक दिसून येत आहे. उदाहरणार्थ, तुषार सिंचन संचाचा दर पूर्वी सुमारे ३२ हजार ७०० रुपये होता. आता त्याची किंमत वाढून सुमारे ४४ हजार रुपये झाली आहे. म्हणजेच जवळपास २५ टक्के वाढ झाली आहे.
advertisement
ठिबक सिंचनासाठी एकरी पूर्वी सुमारे ४० हजार रुपये खर्च येत होता. आता तो खर्च वाढून सुमारे ६० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे, म्हणजेच जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
पीव्हीसी पाईपच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. ७५ एमएम पाईपचा दर पूर्वी ४६० रुपये होता, तो आता वाढून ६२० रुपये झाला आहे. ९० एमएम पाईपची किंमत ५४० रुपयांवरून थेट ८६० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे.
advertisement
मोटार पंपासाठी लागणाऱ्या केबलच्या किमतीत तर सर्वाधिक वाढ झाली आहे. पूर्वी मीटरमागे सुमारे ९० रुपये असलेली केबल आता १६५ रुपयांपर्यंत पोहोचली असून यात जवळपास ८५ टक्के वाढ झाली आहे.
मोटार पंपाच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. ५ एचपी मोटार पंपाचा दर पूर्वी सुमारे २२ हजार ५०० रुपये होता, तो आता २४ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच ७.५ एचपी मोटार पंपाची किंमत ३१ हजार रुपयांवरून ३४ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचली असून यात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 9:15 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी पंपापासून ते पीव्हीसी पाईपपर्यंत! अमेरिका-इराणच्या युद्धमुळे सिंचन साहित्याचे दर कडाडले, कोणत्या वस्तूला किती भाव?










