तुरीच्या दरात मोठी घसरण, हमीभावापेक्षा कमी मिळतोय भाव, शेतकरी हवालदिल
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बाजारात मिळणारा दर हा हमीभावापेक्षाही कमी असल्याने शेतकरी निराश असल्याचे पाहायला मिळते. पाहुयात जालना बाजारामध्ये तूर दराची स्थिती कशी आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : तुरीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल आहेत. हंगामाच्या सुरुवातीला तुरीला 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल हा दर मिळाला. मात्र आवकेचा दबाव वाढताच तुरीचे दर 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आले. आता तुरीच्या दरात आणखी घसरण झाली असून ती 6,500 ते 7 हजार 300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. तुरीला केंद्र सरकारने 7, 550 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात मिळणारा दर हा हमीभावापेक्षाही कमी असल्याने शेतकरी निराश असल्याचे पाहायला मिळते. पाहुयात जालना बाजारामध्ये तूर दराची स्थिती कशी आहे.
advertisement
कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील भुसार मार्केटमध्ये दररोज 5 ते 6 हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे. पांढरी, लाल आणि काळी अशा तीन प्रकारच्या तुरीची आवक बाजार समितीमध्ये होत आहे. पांढऱ्या रंगाच्या तुरीला गुणवत्तेनुसार 6,700 ते 7,300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. तसेच लाल रंगाच्या तुरीलाही 6,700 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. काळ्या रंगाची तूर मात्र भाव खाऊन जात आहे. काळ्या रंगाच्या तुरीला 7,700 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे.
advertisement
लाल व पांढरी तुरीच्या तुलनेत काळ्या रंगाच्या तुरीची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे या तुरीला मागणी आहे. त्यामुळे दर देखील अधिक आहेत. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वसामान्यांना बारा लाख रुपये उत्पन्न करमुक्त केले. यामुळे तुरीच्या दरावर सकारात्मक परिणाम होईल अशी शक्यता वाटत होती. मात्र तुरीचे दर सोमवारी देखील त्याच दर पातळीवर कायम राहिले. यामुळे व्यापारी वर्गात, शेतकऱ्यांचाही अपेक्षा भंग झाला. आगामी काळात तुरीला 8 हजार रुपयांपर्यंत दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असल्याचे व्यापारी पाचफुले यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान केंद्र सरकारने तुरीला 7, 750 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे. बाजारात मिळणारा दर हा हमीभावापेक्षा कमी असल्याने सरकारने तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करत आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 03, 2025 7:33 PM IST









