हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मंगळवार, २८ ऑक्टोबरच्या रात्री ‘मोंथा’ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊन ते आंध्रप्रदेशातील काकीनाडा किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकेल.
एमजेओचा परिणाम
सध्या बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील भागात मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) या हवामान दोलनाचा प्रभाव दिसत आहे. हा प्रभाव फेज ४ आणि ५ मध्ये सक्रिय असून त्याची आम्प्लिट्युड २ च्या आसपास आहे. या दोलनामुळे 'मोंथा' चक्रीवादळाला अतिरिक्त ऊर्जा मिळत असून त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या वादळाचा परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवेल.
advertisement
विदर्भात तीन दिवसांचा पाऊस (28 ते 30 ऑक्टोबर)
वादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकल्यानंतर त्याचा प्रभाव विदर्भात तीन दिवस (२८, २९ आणि ३० ऑक्टोबर) राहणार आहे. हवामान खात्याने सांगितले की, या काळात गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, वर्धा आणि अकोला परिसरातही अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही या वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम दिसेल. औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र व कोकणात पावसाची शक्यता
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राचा परिणामदेखील महाराष्ट्रावर पडत आहे. हे क्षेत्र सध्या मुंबईच्या नैऋत्य दिशेला सुमारे ६६० किमी अंतरावर असून ते ईशान्य दिशेने सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे २९ ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना काय?
हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांसाठी पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. काढणीला आलेली सोयाबीन, उडीद, हरभरा, कापूस आणि भात यांसारखी पिके शक्य असल्यास लवकर काढून सुरक्षित ठिकाणी साठवावीत. धान्याचे वाळवण थांबवावे आणि ते सुरक्षित ठिकाणी हलवावे. पिकांवरील फवारणी व खतांचा वापर पुढील काही दिवस टाळावा.
जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि पाण्याची निचरा व्यवस्था सुनिश्चित करावी
