मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायम असलेल्या ढगाळ वातावरणामुळे फळबागांपुढे गंभीर संकट उभं राहिलं आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने विविध बुरशीजन्य व किडीजन्य रोग झपाट्याने पसरू लागले असून त्याचा थेट फटका फळ पिकांना बसत आहे. परिणामी यंदा द्राक्ष, आंबा, काजू, डाळिंब, संत्री यांसह बहुतेक सर्वच फळ पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
advertisement
द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम
राज्यात द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर हे जिल्हे महत्वाचे मानले जातात. सुमारे तीन ते साडेतीन लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष शेती केली जाते. ऑक्टोबर छाटणीनंतर बागांमध्ये द्राक्षांचा बहार सुरू असतानाच ढगाळ हवामानामुळे भुरी आणि डाऊनी मिल्ड्यूस या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना वारंवार फवारण्या कराव्या लागत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. वेळेवर उपाययोजना न केल्यास द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आंब्यालाही धोका
आंबा पिकालाही सध्याच्या हवामानाचा फटका बसत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा लागवड आहे. राज्यात जवळपास चार लाख एकर क्षेत्र आंबा पिकाखाली आहे. ढगाळ हवामानामुळे आंब्यावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून नवीन पालवी आणि मोहोर गळून पडत आहे. याचा थेट परिणाम फळधारणेवर होणार असल्याने यंदाचा आंबा हंगाम कमकुवत राहण्याची शक्यता आहे.
डाळिंब शेतीवरही संकटाची छाया आहे. सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत सुमारे अडीच लाख एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. सध्या या बागांमध्ये तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. फळांवर तेलकट डाग पडत असल्याने गुणवत्ता घसरते आणि शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही.
काजू उत्पादक शेतकरी संकटात
काजू उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सुमारे तीन लाख एकरवर काजू लागवड आहे. ढगाळ हवामानामुळे काजूवर मावा व भुरीचा प्रादुर्भाव वाढला असून काजू व काजूगरांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
राज्यात संत्री, पेरू, चिकू, सीताफळ, लिंबू, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, जांभूळ अशा विविध फळ पिकांची लागवड मिळून एकूण सुमारे 30 लाख एकर क्षेत्र आहे. सध्याच्या हवामानामुळे या सर्वच फळबागांना धोका निर्माण झाला असून सरासरी 10 ते 20 टक्के उत्पादन घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
10 हजार कोटींचे नुकसान होण्याची भीती
कृषी तज्ज्ञ डॉ. अभयकुमार बागडे यांनी सांगितले की, ढगाळ वातावरणात बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक असतो. त्यामुळे रोगांची तीव्रता लक्षात घेऊन योग्य प्रमाणात औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, रोग नियंत्रणासाठी वाढलेल्या खर्चामुळे आणि उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना राज्यभरात पाच ते दहा हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
