द्राक्ष व फळपिके निर्यातीस चालना
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की सांगली जिल्हा हा द्राक्ष निर्यातीसाठी महत्त्वाचा आहे. याशिवाय डाळिंब, भाजीपाला व इतर फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन येथे घेतले जाते आणि त्याची निर्यातही होते. जागतिक बाजारपेठेत स्पर्धा वाढवण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता आणि शाश्वत शेती पद्धती महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी रेसिड्यू लॅब उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केली असून, या संदर्भात निर्णय डिसेंबरच्या अधिवेशनात घेतला जाईल. त्यासाठी आवश्यक तरतूद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
म्हैसाळ सिंचन योजना व महामार्ग प्रश्न
बैठकीत म्हैसाळ सिंचन योजनेची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याबाबतही चर्चा झाली. यासाठी निधीची तरतूद केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून, “पर्यायी मार्ग उपलब्ध असताना हा महामार्ग का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर अजित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
साखर कारखानदारांसाठी संदेश
“ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हे तंत्रज्ञान स्वीकारून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्याचा वापर उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी व्हावा. पाणी व्यवस्थापन, रोगनियंत्रण, हवामान अंदाज, पिकांच्या वाढीचे परीक्षण आदींसाठी एआय तंत्रज्ञान मोठी मदत करू शकते. त्यामुळे कारखानदारांनी पुढाकार घेतला तर ऊस उत्पादनात निश्चितच वाढ होईल,” असे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा समावेश होता. आम्ही हे आश्वासन दिले आहे. कर्जमाफी करणार नाही असे कधीच म्हटलेले नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या कार्यकाळात योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल.
एआयचा द्राक्ष शेतीत वापर
अजित पवार यांनी एआयचा द्राक्ष शेतीत वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे ते म्हणाले की, ''द्राक्ष शेतीत आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी हवामानाचा तंतोतंत अंदाज, रोग-कीड नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन आणि उत्पादन नियोजन यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.द्राक्ष शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निर्यातीस चालना मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची गुणवत्ता टिकेल.”