Bhiwandi Crime : एका टॅटुमुळे सापडला खुनाचा आरोपी! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?
Last Updated:
Bhiwandi Crime News : एका साध्या टॅटूमुळे अखेर पोलिसांना दहा महिन्यांपासून फरार असलेला खुनाचा आरोपी सापडला. आरोपीने एकतर्फी प्रेमात बुडून तरुणीची हत्या केली होती
भिंवडी : दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवत फिरणाऱ्या हत्येच्या मुख्य आरोपीला अखेर कायद्याच्या जाळ्यात ओढण्यात यश आलेले आहे. आरोपीने पळून जाण्यासाठी आणि आपली खरी ओळख लपवण्यासाठी अनेक डावपेच रचले.तसेच तो ठिकाणे बदलत राहिला, वेगवेगळी नावे वापरत राहिला, पण त्याच्या शरीरावर कोरलेला टॅटू मात्र त्याच्यासाठी घातक ठरला. हा टॅटूच त्याच्या अटकेचे प्रमुख कारण ठरल्याने गुन्ह्याचे रहस्य उलगडले. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी दाखवलेले हे कसब मोठे यश मानले जात आहे.
अटक झालेल्या आरोपीचे नाव राजू महेंद्र सिंग (वय २२) असे आहे. राजूवर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भिवंडीतील एका तरुणीचा खून केल्याचा गंभीर आरोप आहे. आरोपीचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, त्याच्या भावना नाकारल्या गेल्याने संतापलेल्या सिंगने थेट तिच्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. एवढ्यावरच थांबता न बसता, त्या वेळी बहीण मदतीला धावून आली असता तिच्यावरही चाकूहल्ला करण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती.
advertisement
या प्रकरणात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्राथमिक तपासात दोन जणांना अटक करण्यात आली. पण मुख्य आरोपी असलेला राजू मात्र घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर तो सतत पळत राहिला. महाराष्ट्रातून बाहेर पडून तो मध्य प्रदेशपर्यंत पोहोचला. दहा महिने पोलिस त्याचा शोध घेत होते, पण तो प्रत्येक वेळी हातातून निसटत होता.
advertisement
टॅटूमुळे आरोपीचा भांडाफोड!
शेवटी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने मध्य प्रदेशात शोधमोहीम राबवली. संशयितांवर लक्ष ठेवताना पोलिसांना एका तरुणाच्या हातावर टॅटू दिसला. हा टॅटू नेमका आरोपी राजू सिंगच्या ओळखीशी मिळता-जुळता होता. लगेच पोलिसांनी त्याची चौकशी केली असता सत्य उघड झाले. त्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
या यशस्वी कारवाईनंतर आरोपीला भिवंडी येथे आणण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून, त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेनंतर नागरिकांनी शांतीनगर पोलिसांचे कौतुक केले असून, इतक्या महिन्यांपासून पळून गेलेल्या आरोपीला पकडणे हे पोलिसांचे मोठे यश असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 9:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi Crime : एका टॅटुमुळे सापडला खुनाचा आरोपी! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?