मुंबई : यंदाच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका आहे. त्याचा थेट परिणाम वाइन उद्योगावर होण्याची शक्यता आहे. द्राक्षांच्या उत्पादनात तब्बल 60 टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या घटीमुळे राज्यातील वाइन निर्मितीत जवळपास एक कोटी लिटरची कमी होऊ शकते. अतिवृष्टी, महापुरासह हवामानातील सततच्या बदलांनी द्राक्ष बागायती पट्ट्यातील उत्पादन साखळी विस्कळीत केली आहे.
advertisement
द्राक्षांचं मोठं नुकसान
राज्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. विशेषतः नाशिक, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली या द्राक्षपट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही भागांत तर द्राक्षबागांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. सततच्या पावसामुळे द्राक्ष वेलींच्या काड्यांवर सुक्ष्म घड निर्मिती न होऊ शकल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली.
वाइन उद्योगाला मोठा फटका
राज्यात वाइननिर्मितीसाठी वेगवेगळ्या जातींच्या द्राक्षांची लागवड केली जाते. गेल्या काही वर्षांत अशी लागवड दहा हजार हेक्टरपर्यंत पोहोचली होती. मात्र बदलत्या हवामानामुळे, पिकांची वाढती अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ आणि द्राक्षबागांवरील नैसर्गिक संकटांमुळे आता हे क्षेत्र एकूण सहा हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे वाइन उद्योगाला अपेक्षित दर्जेदार द्राक्षांचा पुरवठा अडखळण्याची भीती निर्माण झाली आहे.
द्राक्षांचा पुरवठा कमी
वाइनसाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांमध्ये खाण्यासाठीच्या सामान्य द्राक्षांचाही समावेश असतो. बाजारात विक्री झाल्यानंतर बागेत शिल्लक राहिलेल्या या द्राक्षांपासून दरवर्षी दीड कोटी लिटरपर्यंत वाइन तयार होत असे. पण यंदा द्राक्ष उत्पादनातील घट, बेदाणा निर्मितीसाठी वाढती मागणी आणि बाजारातील वाढते दर यांच्या पार्श्वभूमीवर वाइन उद्योगाला आवश्यक प्रमाणात द्राक्षे मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षी उद्योगाकडून द्राक्षांची खरेदी 20 ते 25 रुपये प्रति किलो दराने होत होती. मात्र यंदा 40 ते 50 रुपये दर देऊनही पुरवठा सुनिश्चित होईलच, अशी खात्री उद्योगाला नाही. त्यामुळे वाइन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तीन कोटी लिटर वाइन निर्मिती
राज्यात सध्या एकूण तीन कोटी लिटर वाइन निर्मिती होते. मात्र यंदाच्या परिस्थितीनुसार ही निर्मिती दोन कोटी लिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उच्च दर्जाच्या वाइन उत्पादनातही मोठी घट अपेक्षित आहे. सुमारे दीड कोटी लिटर उच्च गुणवत्तेची वाइन दरवर्षी तयार होत असली, तरी यंदा त्यात 50 हजार लिटरपर्यंत घट होऊन एक कोटी लिटर उत्पादन शिल्लक राहील, असा अंदाज ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनने वर्तवला आहे.
क्वालिटीमध्ये फरक होणार का?
द्राक्षाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे वाइनच्या क्वालिटीमध्ये फरक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाइन निर्मितीला पुरेपूर माल मिळाल्यास उच्च प्रतीची वाइन तयार होत असते.
वाइनच्या दरात वाढ होणार?
मागील वर्षांचे वाइन स्टॉक उपलब्ध असल्यामुळे सप्टेंबर 2026 पर्यंत बाजारात तुटवडा जाणवणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, उत्पादनातील घट आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमती यामुळे वाइनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी म्हटले आहे.
