मुंबई : मराठी माणूस व्यवसायात टिकत नाही असा गैरसमज अनेक वर्षांपासून समाजात रूढ आहे. मात्र इच्छाशक्ती, मेहनत आणि दूरदृष्टी असेल तर कोणताही माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकतो, हे अनेक मराठी व्यावसायिकांनी सिद्ध करून दाखवले आहे. अगदी मोजक्या भांडवलातून सुरू झालेला व्यवसायही योग्य नियोजन आणि सातत्याने कोट्यवधींच्या उलाढालीपर्यंत पोहोचू शकतो.
advertisement
एका शेतकऱ्याने तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवले आहे. शेणासारख्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या घटकातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला असून, त्या कमाईतून तब्बल एक कोटी रुपयांचा भव्य बंगला बांधला आहे. विशेष म्हणजे या बंगल्याला त्यांनी “गोधन निवास” असे अर्थपूर्ण नाव दिले आहे.
संघर्षातून संधीपर्यंतचा प्रवास
प्रकाश नेमाडे असं शेतकऱ्याचे नाव असून ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील इमदेवडी या छोट्या गावात राहतात. वडिलोपार्जित चार एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली होती, मात्र ती कोरडवाहू असल्याने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. पाण्याअभावी शेती करणे कठीण झाल्यानंतर त्यांनी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ एकच गाय होती. ते गावोगावी दूध विकून आपले घर चालवत होते.
150 हून अधिक जनावरे
हळूहळू त्यांनी दुग्धव्यवसाय वाढवला. आज त्यांच्या गोठ्यात 150 हून अधिक गायी आहेत. मात्र प्रकाश नेमाडे यांची खरी ओळख केवळ दूध उत्पादक म्हणून नाही, तर एक दूरदृष्टी असलेला उद्योजक म्हणून आहे. दूध विक्रीपुरते मर्यादित न राहता त्यांनी गायींच्या शेणातूनही उत्पन्न मिळवण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी दूध देणे थांबलेल्या गायी दुर्लक्षित केल्या जातात, पण त्यांनी त्या गायींची शेवटपर्यंत काळजी घेतली. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध झाले.
सेंद्रिय खत आणि बायोगॅसची संधी
आज शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढत आहे. रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक पर्यायांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने शेणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच बायोगॅस प्रकल्पांनाही मोठ्या प्रमाणावर शेणाची आवश्यकता असते. प्रकाश नेमाडे यांनी ही संधी अचूक ओळखली आणि शेण विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय उभारला. यातून त्यांना स्थिर आणि मोठे उत्पन्न मिळू लागले.
रोजगार आणि प्रेरणास्थान
आज कोरड्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या या व्यवसायाची उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रकाश नेमाडे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना स्वतः भेटून मार्गदर्शन करतात. आणि शेतीपूरक व्यवसायातून यश कसे मिळवता येते, याची प्रेरणा देत आहेत.
