मुंबई : वाढता खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि हवामानातील बदल यामुळे शेती व्यवसायातून अपेक्षित नफा मिळत नसल्याची भावना अनेक शेतकऱ्यांमध्ये दिसून येते. परिणामी काही शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. मात्र, याच परिस्थितीत काही शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा विचार करून नव्या प्रयोगांकडे वळत आहेत. आणि त्यातून आर्थिक स्थैर्य निर्माण करत आहेत. अशाच एक प्रयोग यशस्वी ठरला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील सलेमपूर कला गावातील शेतकरी रूप सिंग वैष्णव यांनी पांढऱ्या चंदनाच्या शेतीतून करोडो रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
14 वर्षापूर्वी केली लागवड
14 वर्षांपूर्वी रूप सिंग वैष्णव यांनी एक वेगळा निर्णय घेतला. त्यांच्या गावातील हरभजन सिंग नावाच्या एका संतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कर्नाटकातून पांढऱ्या चंदनाची रोपे मागवली. एकूण 500 रोपे खरेदी करण्यासाठी त्यांनी सुमारे 65 हजार रुपयांची गुंतवणूक केली.
500 झाडांपैकी 200 झाडे जगली
ही रोपे त्यांनी जवळपास दोन हेक्टर जमिनीवर लावली. सुरुवातीच्या काळात हवामान, जमिनीचा प्रकार आणि देखभालीच्या अडचणींमुळे सर्व रोपे जगली नाहीत. अखेर त्यापैकी सुमारे 200 झाडेच व्यवस्थित वाढली. पांढऱ्या चंदनाची लागवड ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या झाडांना पूर्णपणे तयार होण्यासाठी साधारणतः 14 ते 15 वर्षांचा कालावधी लागतो.
200 झाडांपासून करोडोची कमाई
शेतकऱ्याच्या मते, एका पांढऱ्या चंदनाच्या झाडाची बाजारातील किंमत सध्या 5 ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्या हिशोबाने त्यांच्या शेतातील सुमारे 200 झाडांची एकूण किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक मिळाली. पांढऱ्या चंदनाच्या लाकडाला धार्मिक पूजाविधी, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठी मागणी आहे. त्यामुळे भविष्यातही या पिकाला चांगला बाजार मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
