मुंबई : कोकणातील बहुतांश तरुण शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर शहरांकडे वळतात. स्थानिक पातळीवर मर्यादित संधी, शेतीतून कमी उत्पन्न आणि अनिश्चित बाजारपेठ यामुळे गावात थांबण्याचा आत्मविश्वास अनेकांना मिळत नाही. मात्र या प्रवाहाला छेद देत कोकणातील एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीतून यश मिळवून दाखवले आहे. संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचा शुभम दोरकडे या तरुणाने कृषी शिक्षणाचा योग्य वापर करत बिगर हंगामी कलिंगड लागवडीचा प्रयोग केला असून, पहिल्याच प्रयत्नात त्याला आर्थिक यश मिळाले आहे.
advertisement
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेतल्यानंतर शुभमसमोर नोकरीचा पर्याय उपलब्ध होता. मात्र शहरांकडे जाण्याऐवजी त्याने स्वतःच्या शेतात काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेतीपेक्षा प्रयोगशील आणि बाजाराभिमुख शेती केल्यास गावात राहूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं, हा विचार त्यामागे होता. याच विचारातून त्याने कलिंगडाच्या बिगर हंगामी लागवडीचा धाडसी निर्णय घेतला.
सप्टेंबरमध्ये केली लागवड
सप्टेंबर महिन्यात त्याने आपल्या बागेतील दोन ओळींमध्ये विशेष बेड तयार करून ‘विजय’ या वाणाची कलिंगड लागवड केली. साधारणतः उन्हाळ्यात घेतलं जाणारं हे पीक हंगामाबाहेर घेणं मोठं आव्हान होतं. हवामान, रोगराई आणि बाजारभाव या सगळ्यांचा विचार करून शुभमने आधीच सखोल नियोजन केलं. ठिंबक सिंचन व्यवस्थेद्वारे पाण्याचं योग्य नियोजन करत खत व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला.
लागवडीच्या सुरुवातीपासूनच ह्युमिक अॅसिड, 19:19:19 विद्राव्य खत, तसेच आवश्यक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा संतुलित वापर करण्यात आला. बेसल डोसमध्ये सेंद्रिय खत, स्मार्ट मिल, 10:26:26, सूक्ष्म अन्नद्रव्ये, घरचं गांडूळ खत, पोटॅशियम शोनाइट, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन यांचा ठिंबक सिंचनाद्वारे पुरवठा करण्यात आला. चार ते पाच दिवसांच्या अंतराने फवारण्या घेत पिकावर सातत्याने लक्ष ठेवल्यामुळे वाढ चांगली झाली आणि उत्पादनाची गुणवत्ता उच्च दर्जाची राहिली.
उत्पादनाइतकीच विक्रीही महत्त्वाची असल्याने शुभमने लागवड सुरू असतानाच बाजारपेठेचा अभ्यास केला. पुणे, वाशी आणि नवी मुंबई येथील बाजारपेठांना भेट देऊन व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधला. दरांचा अंदाज घेऊन विक्रीची रणनीती ठरवली. परिणामी, शेतातूनच प्रतिकिलो 20 रुपये दराने थेट विक्री सुरू झाली. लागवडीनंतर अवघ्या 52 दिवसांत तोडणी सुरू झाली असून सुमारे 10 टन उत्पादन अपेक्षित आहे.
लाखोंचा नफा
या प्रयोगातून सुमारे दोन लाख रुपयांचं एकूण उत्पन्न होणार असून, खर्च वजा जाता सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळेल, असा अंदाज आहे. पहिल्याच प्रयोगात मिळालेलं हे यश शुभमसाठीच नव्हे, तर कोकणातील इतर तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृषी शिक्षण आणि बाजारपेठेची योग्य सांगड घातली तर गावात राहूनही शेतीतून शाश्वत रोजगार आणि चांगलं उत्पन्न मिळू शकतं, हे शुभम दोरकडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
