पानांवरील ठिपके करपा किंवा लिफ स्पॉट
करपा हा बुरशीजन्य रोग असून कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो. वातावरणात सकाळी धुके आणि दव पडत असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.
Business Idea: केक, बिस्किटं आणि मसाले बनवून व्हा उद्योजक, दिव्यांगांसाठी पुण्यात खास कार्यशाळा!
advertisement
लिफ स्पॉट रोगाची लक्षणे
अंडाकृती, लंबगोलाकार, तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. वाळून गळून पडते.
असे करा नियंत्रण
फवारणी प्रतिलिटर पाणी मँकोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ते 3 ग्रॅम. जास्त दिवस धुके राहिल्यास पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून 15 दिवसांच्या अंतराने करावी.
पानांवरील ठिपके म्हणजेच लिफ ब्लॉच
हा रोग टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होतो. वातावरणातील आर्द्रता वाढल्यास प्रादुर्भाव होतो.
लक्षणे
पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालच्या भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे 1 ते 2 सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने सोंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.
उपाय
रोगट पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी. कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम किंवा मँकोझेब 2.5 किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम. प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील फवारणी 10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
रोग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या बाबी
हळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
हळद पिकास लागवडीपासून 6 ते 7 महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात. ही फुले दांड्यासहित काढावीत. फुले काढल्यामुळे पूर्ण अन्नपुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते. रिफारीत वेळेत हळदीची भरणी करावी. त्यामुळे रोग किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो. हळदीनंतर परत हळद किंवा आले यांसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.
सप्टेंबर ते नोव्हेंबर हा हळद पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरतो. या काळात पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. परंतु तज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वेळीच योग्य ती खबरदारी घेतली तर रोग नियंत्रण होऊन पिकाची गुणवत्ता कायम राखण्यास नक्की मदत होईल.