मुंबई : अलिकडच्या काही वर्षांत शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता अनेक शेतकरी आता नव्या, नाविन्यपूर्ण आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळले आहेत. अशाच श्रीमंतीकडे नेणाऱ्या शेती प्रकारांपैकी एक म्हणजे चंदनाची शेती. योग्य नियोजन, संयम आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवली तर चंदन लागवड शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र पूर्णपणे बदलू शकते. कमी क्षेत्रातही मोठा नफा देणारे हे पीक सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
चंदन शेतीकडे वाढता कल
देशात विशेषतः कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी चंदन शेतीतून लाखो-कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. चंदनाचे लाकूड अत्यंत मौल्यवान मानले जाते. त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकणारा आणि दर्जेदार असल्याने अत्तर, अगरबत्ती, सौंदर्यप्रसाधने, औषधे, पूजा साहित्य, हस्तकला वस्तू आणि फर्निचरमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही चंदनाला मोठी मागणी आहे.
चंदन लागवडीसाठी योग्य काळ आणि तयारी
चंदनाची लागवड वर्षभर करता येते, मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ सर्वात अनुकूल मानला जातो. लागवडीसाठी वापरण्यात येणारी रोपे किमान दोन वर्षांची आणि निरोगी असावीत. रोपांची निवड करताना त्यांची मुळे मजबूत आहेत का, याची खात्री करणे आवश्यक आहे. लागवडीनंतर पहिल्या दोन वर्षांत झाडांची योग्य निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
चंदनाच्या झाडाला पाणी साचलेली जमीन अजिबात चालत नाही. त्यामुळे लागवडीच्या ठिकाणी निचरा उत्तम असणे गरजेचे आहे. फार जास्त पाणी देण्याची गरज नसते, मात्र सुरुवातीच्या काळात माती कोरडी पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
कमी खर्चात दीर्घकालीन मोठा नफा
चंदन शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक ओसाड, माळरान किंवा कोरडवाहू जमिनीवरही घेता येते. बागायती जमीन किंवा सतत पाणी उपलब्ध असणे आवश्यक नाही. योग्य अंतर ठेवून लागवड केल्यास एका एकरात साधारण 500 ते 600 चंदनाची झाडे लावता येतात.
चंदनाचे झाड पूर्ण वाढीस येण्यासाठी साधारण 12 ते 15 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र ही प्रतीक्षा अत्यंत फायदेशीर ठरते. बाजारात एका प्रौढ चंदनाच्या झाडापासून 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. याच हिशेबाने एका एकरातील झाडांमधून कोट्यवधी रुपयांची कमाई शक्य आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास एका एकरातून 20 ते 30 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.
दरम्यान, चंदनाची लागवड करण्यासाठी विशेष परवानगी लागत नसली, तरी झाड तोडण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी स्थानिक नियमांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, दीर्घकालीन नियोजन आणि संयम ठेवला तर चंदन शेती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकते.
