मुंबई : सध्याच्या काळात पारंपरिक पिकांमधून अपेक्षित नफा मिळत नसल्याने अनेक शेतकरी कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. त्यातच सध्या बाजारात मोठी मागणी असलेले पीक म्हणजे लाल कोबी. आरोग्यदृष्ट्या फायदेशीर, हॉटेल, रेस्टॉरंट, सॅलड व प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी लाल कोबी अवघ्या 55 ते 65 दिवसांत तयार होत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. योग्य नियोजन केल्यास केवळ दोन महिन्यांत एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे.
advertisement
लाल कोबीची मागणी का वाढते आहे?
लाल कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन C आणि K भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी, मधुमेह, हृदयविकार आणि पचनासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते. शहरांतील सुपरमार्केट, मॉल, फाइव स्टार हॉटेल्स, सॅलड बार आणि निर्यात बाजारात लाल कोबीला चांगला दर मिळतो. त्यामुळे तिची लागवड फायदेशीर ठरत आहे.
लागवडीसाठी योग्य हवामान व जमीन
लाल कोबीसाठी थंड व समशीतोष्ण हवामान पोषक असते. 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात पीक चांगले येते. मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन सर्वोत्तम मानली जाते. जमीन सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असल्यास उत्पादनात वाढ होते.
लागवड पद्धत
लाल कोबीची रोपे ट्रे किंवा नर्सरीत तयार केली जातात. 25 ते 30 दिवसांची निरोगी रोपे शेतात लावली जातात. दोन ओळींतील अंतर सुमारे 45 ते 60 सेंटीमीटर ठेवले जाते. ठिबक सिंचन केल्यास पाण्याची बचत होते तसेच उत्पादनही वाढते.
एकरी खर्च किती?
लाल कोबीची एकरी लागवड करण्यासाठी सरासरी 70,000 ते 90,000 रुपये खर्च येतो. जसे की,
रोपे -15,000 ते 20,000 रुपये
खत व औषधे - 20,000 रुपये
मजुरी व मशागत -15,000 रुपये
सिंचन व इतर खर्च -10,000 ते 15,000 रुपये
योग्य व्यवस्थापन केल्यास खर्च नियंत्रित ठेवता येतो.
उत्पादन व उत्पन्न
एकरी लाल कोबीचे सरासरी उत्पादन 8 ते 10 टन इतके मिळते. बाजारात लाल कोबीचा दर हंगामानुसार बदलतो. सध्या घाऊक बाजारात दर 20 ते 40 रुपये प्रति किलो, तर थेट विक्रीत 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. सरासरी हिशोब केला तर 8 टन उत्पादन × 30 रुपये = 2.40 लाख रुपये खर्च वजा करता निव्वळ नफा = 1.50 ते 1.70 लाख रुपये. विशेष म्हणजे हे उत्पन्न अवघ्या दोन महिन्यांत मिळते.
रोग व कीड नियंत्रण
कोबीवरील अळी, मावा आणि बुरशीजन्य रोगांवर वेळेवर जैविक किंवा शिफारस केलेली औषधे वापरल्यास नुकसान टाळता येते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास दरही अधिक मिळतो.
