मुंबई : कृषी उत्पादनांपासून औषधे, रसायने आणि अभियांत्रिकी वस्तूंपर्यंत तब्बल तीनशेहून अधिक भारतीय उत्पादनांसाठी रशियन बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध असल्याचे चित्र समोर आले आहे. भारतात या वस्तूंचे उत्पादन क्षमता आणि दर्जा दोन्ही मजबूत असल्याने रशियामध्ये भारतीय निर्यातीचा विस्तार करता येऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारत–रशिया व्यापार संबंध अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने वाणिज्य मंत्रालयाने सविस्तर आराखडा तयार केला आहे.
advertisement
भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, सध्या भारताची रशियाशी असलेली व्यापारी तूट सुमारे 59 अब्ज डॉलर इतकी मोठी आहे. ही तूट कमी करण्यासाठी भारताकडून निर्यात वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मंत्रालयाचे मत आहे. सध्या रशियाच्या एकूण आयातीत भारतीय वस्तूंचा वाटा केवळ 2.3 टक्के इतकाच आहे, जो वाढविण्यास मोठा वाव असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
भारताकडून आयात वाढली
गेल्या काही वर्षांत भारताची रशियाकडून आयात झपाट्याने वाढली आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये भारताने रशियाकडून अवघ्या 2 अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात केले होते. मात्र, 2024 पर्यंत ही आयात थेट 57 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. सध्या भारताच्या एकूण तेल आयातीत रशियन तेलाचा वाटा सुमारे 21 टक्के आहे, तर काही कालावधीत हा वाटा 35 ते 38 टक्क्यांपर्यंत गेला होता. याशिवाय भारत रशियाकडून खते आणि खाद्यतेलाचीही मोठ्या प्रमाणावर आयात करतो.
दुसरीकडे, निर्यातीच्या बाबतीत भारताला अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. श्रमकेंद्रित उद्योगांमध्ये कपडे, कापड, चमड्याच्या वस्तू, हातमाग उत्पादने आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या क्षेत्रांत भारतीय उत्पादनांना रशियन बाजारपेठेत मागणी निर्माण होऊ शकते. मात्र, सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कापड क्षेत्रात भारताचा वाटा एक टक्क्यांहूनही कमी आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कृषी व्यवसायाची संधी
रशिया दरवर्षी सुमारे 3.9 अब्ज डॉलरचा शेतमाल आयात करतो. त्यामध्ये भारताचा वाटा केवळ 45.2 कोटी डॉलर इतकाच आहे. याशिवाय यंत्रसामग्री, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, केबल, इंजिन, चेसिस तसेच स्टील आणि मेटल उत्पादनांची रशियाची आयात अब्जावधी डॉलरमध्ये आहे. अभियांत्रिकी वस्तूंच्या बाबतीत रशियाची आयात सुमारे 2.7 अब्ज डॉलर इतकी असून, भारताची निर्यात मात्र अवघी 9 कोटी डॉलर आहे. सध्या रशिया चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, त्यामुळे भारतासाठी या क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे.
