सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने गल्फ देशांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या काळात महाराष्ट्रातून केळी, द्राक्षे, कांदा, कलिंगड, खरबूज तसेच तांदूळ यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक बंदरे बंद ठेवण्यात आली असून वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणावर निर्यातीसाठी पाठवलेले कंटेनर अडकून पडले आहेत.
advertisement
संकट गंभीर, तर पुणेकर खंबीर! दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी मोठा निर्णय, Video पाहून कराल कौतुक!
मुंबई बंदरात सुमारे 250 ते 300 रेफर कंटेनर केळीचे, जवळपास 100 कंटेनर द्राक्षांचे तसेच 350 ते 400 इतर कृषीमालाचे कंटेनर अडकले आहेत. याशिवाय बंदरांपर्यंत पोहोचू न शकलेले किंवा मार्गात अडकलेले मिळून सुमारे 900 ते 1000 कंटेनर अडकल्याचा अंदाज आहे. एका केळीच्या कंटेनरमध्ये साधारण 22 टन माल असतो, ज्याची किंमत अंदाजे 24 ते 25 लाख रुपये असते, तर त्यावर 2.5 ते 3 लाख रुपयांचा शिपिंग खर्च येतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्येही दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. मार्केटयार्डमध्ये दोन दिवसांपूर्वी कांद्याला 12 ते 15 रुपये किलो दर मिळत होता, तो आता 8 ते 10 रुपयांवर आला आहे. कलिंगडाचे दर 25 ते 28 रुपयांवरून थेट 8 रुपयांपर्यंत घसरले आहेत, तर केळीचे दर 18 ते 20 रुपयांवरून 12 ते 13 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. अशी माहिती व्यापारी सुयोग झेंडे यांनी दिली आहे.
दुसरीकडे, इराणमधून भारतात येणारी सफरचंद, किवी आणि खजूर यांची आयातही बंद झाली आहे. त्यामुळे बाजारात सफरचंदाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून मागील आठवड्यात 10 किलोचे 1100 ते 1200 रुपये असलेले दर आता 1500 ते 1600 रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच ड्रायफ्रूटचे दरही वाढू लागले आहेत.
या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून कृषी निर्यात क्षेत्रावर या युद्धाचा गंभीर परिणाम होत आहे.





