मुंबई : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) ही सर्वात लोकप्रिय आणि थेट लाभ देणारी योजना मानली जाते. या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे. खरोखरच पात्र असलेल्या लहान व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतीचा खर्च भागवण्यास हातभार लावणे. सध्या या योजनेचा 22 वा हप्ता कधी मिळणार? याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
नियम अटी काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा फायदा फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळतो, जे शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार पात्र ठरतात. त्यामुळे योजना सुरू करताना सरकारकडून लाभार्थ्यांची काटेकोर छाननी केली जाते.
22 वा हप्ता कधी येऊ शकतो?
सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे 22 वा हप्ता नेमका कधी जमा होणार? पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने जमा केला जातो. मागील हप्त्यांचा कालावधी पाहता, पुढील म्हणजेच 22 वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहावी
हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे अनिवार्य?
प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यापैकी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ई-केवायसी (e-KYC). ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे अजूनही ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ ती पूर्ण करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा नजीकच्या सेवा केंद्रावरून करता येते.
यासोबतच जमीन पडताळणी (Land Verification) हीदेखील अत्यंत महत्त्वाची अट आहे. शेतकऱ्यांच्या नावावर लागवडीयोग्य जमीन आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. जर जमीन पडताळणी अपूर्ण असेल किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील तर हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.
बँक खात्याशी संबंधित कोणती काळजी घ्यावी?
शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच खाते सक्रिय असणे, नावातील स्पेलिंग जुळणे आणि खाते बंद नसणे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे हप्ता अडकतो, त्यामुळे ही माहिती आधीच तपासून घेणे फायदेशीर ठरते.
