सांगली : अतिशय कमी श्रम असणारे पीक म्हणून उसाच्या पिकाकडे पाहिले जाते. परंतु ऊस हे आळशी नव्हे तर काटेकोर व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक असल्याचे सिद्ध करत सांगलीच्या शेतकऱ्याने एकरी 152 टन उच्चांकी ऊस उत्पादन घेतले आहे. एक दीड वर्षात नव्हे तर केल्या आठ-दहा वर्षांपासून जमिनीची तयारी करतोय. तेव्हा एकरी 152 टनाचा उतारा काढणं शक्य झालं, अशी प्रतिक्रिया देत सांगलीच्या तरुण ऊस उत्पादकाने उच्चांकी ऊस उतारा मिळवण्यामागील कहाणी सांगितली.
advertisement
श्रीकांत सुरेश गवळी हे सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील रामापुर या खेडेगावातील सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांच्याकडे एकूण सात एकर शेती असून यापूर्वी ते भाजीपाला पिकवत होते. 2019 पासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह ते सात एकर उसाची शेती करत आहेत. ऊस पिकाबाबत स्वतःच्या अभ्यासासह त्यांनी गन्ना मास्टर या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळेच एकरी 152 टन विक्रमी ऊस उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाच्याचा सल्ला मामाने ऐकला, 50 गुंठे खडकाळ माळरानावर फुलवली शेवंतीची शेती, 6 लाखांचा नफा
आठ फूट सरीतील पहिलाच प्रयोग
ऊस पिकामध्ये सुधारित तंत्रज्ञान येईल तसे सरितील अंतर वाढत राहिले आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये असणारे अडीच, साडेचार फूट अंतर वाढवत श्रीकांत यांनी तब्बल आठ फूट सरीतील अंतर ठेवले आहे. सरीतील अंतर वाढत जाईल तसे सरासरी उत्पादनात वाढ झाल्याचे श्रीकांत यांनी अनुभवले आहे.
आठ वर्षांपासून जमिनीची तयारी
एकरी 152 टन उच्चांकी उतारा घेतलेल्या शेताची गेल्या आठ वर्षांपासून काळजी घेत आहेत. मातीचा सेंद्रिय कर्भ वाढवण्यासाठी हरभरा पिकाचा बेवड ठेवला होता. तसेच शेतातील पाचट,पालापाचोळा न जाळता मातीमध्येच गाढून मातीतील जिवाणू जिवंत ठेवले आहेत.
असे केले करेक्ट व्यवस्थापन
श्रीकांत गवळी यांनी 152 उच्च उतारा मिळवलेल्या शेतामध्ये एकरी सहा ट्रॉली शेणखत वापरले. शेताची उभी-आडवी नांगरट करून 8 फूट अंतरावर सरी सोडली. गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचे 86032 कोईमथूर बियाणे वापरून सव्वा फुटावर रोपांची लागवड केली.
तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळच्यावेळी फवारण्या आणि विद्राव्य खते दिली.
ऊस लागवडीनंतर 39 व्या दिवशी जेठा काढला. 60 व्या दिवशी बैलांच्या सहाय्याने बाळभरणी केली. 90 व्या दिवशी पॉवर टेलरने हलकी भरणी दिली. 111 व्या दिवशी मोठी भरणी दिली. कुठल्याही प्रकारची चालढकल न करता श्रीकांत गवळी यांनी करेक्ट नियोजन केल्याने त्यांना जोमदार ऊस पिकवता आला. एका ऊसास 50-55 कांड्या तर चार-पाच इंच पेराजाडी वाढली.
एकही पाठ पाणी दिले नाही
एकरी 152 उतारा घेतलेल्या शेतात श्रीकांत गवळी यांनी एकही पाठपाणी दिले नाही हे विशेष आहे. संपूर्ण प्लॉट हा केवळ ठिबकच्या सहाय्याने वाढवला. यामुळे ऊसाला पाणी फार लागते हा गैरसमज ठरला आहे.
उत्पादनाचा वाढता आलेख (एकरी)
2019 : 125 टन
2023 : 140 टन
2024 : 152 टन
2019 पूर्वी त्यांना एकरी 70 टनापर्यंत उत्पादन निघत होते.
2019 पासून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन वाढत राहिले.
काय आहे गन्ना मास्टर तंत्रज्ञान
श्रीकांत गवळी यांनी 152 उतारा घेण्यासाठी गणना मास्टर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. गन्ना मास्टर तंत्रज्ञान ही ऊस अभ्यासक आणि प्रयोगशील उत्पादकांनी एकत्र येऊन सुरू केलेले आधुनिक ऊस उत्पादनाचे तंत्र आहे. यामध्ये रासायनिक खते आणि पाण्याचा योग्य आणि आवश्यक वेळी वापर करत, ऊस उत्पादन वाढीवर भर दिला जातो. ऊस उत्पादनाच्या तांत्रिक बाबी शेतकऱ्यांना समजावून देणारी टिम आहे.
गवळी कुटुंबाने उंचावला उत्पादनाचा आलेख
युवा शेतकरी श्रीकांत गवळी यांना शेती कामामध्ये पत्नी, मुलगा आणि आई-वडिलांची मोठी साथ आहे. तज्ज्ञांनी सल्ल्याने आणि संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाने ऊस उत्पादन वाढीचा आलेख उंचावणे शक्य झाले आहे.
अभ्यासपूर्ण आणि करेक्ट व्यवस्थापन करत श्रीकांत गवळी यांनी ऊस उत्पादन वाढीत भरारी घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या त्यांच्या शेतीस अनेक शेतकरी आवर्जून भेट देवून सल्ला घेतात. ऊस हे आळशी लोकांचे नव्हे तर करेक्ट व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक असल्याचे श्रीकांत सांगतात.