भाच्याचा सल्ला मामाने ऐकला, 50 गुंठे खडकाळ माळरानावर फुलवली शेवंतीची शेती, 6 लाखांचा नफा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सांगलीच्या प्रकाश गुरव या शेतकऱ्याने 50 गुंठ्यामध्ये शेवंती फुलवली आहे. पांढऱ्या आणि पिवळ्या शेवंतीतून त्यांनी 9 टनाचे उत्पादन घेतले आहे. यातून त्यांना 6 लाखांचा आर्थिक नफा झाला.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा दुष्काळी तालुक्यांपैकी एक महत्त्वाचा तालुका आहे. या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरीही सिंचन प्रकल्पांमुळे बागायत शेती पिकते. याच तालुक्यातील वांगी गावाला 3600 हेक्टर इतके सर्वाधिक क्षेत्र असून वांगीकर उत्तम शेती करतात. वांगी येथील प्रकाश वसंत गुरव यांनी वांगी गावातील पहिला शेवंती फुलशेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ऊस शेतीच्या शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत सोडून त्यांनी शेवंती फुलवत भरघोस नफा कमावला आहे.
advertisement
वांगी गावचे प्रकाश वसंत गुरव यांना वांगीच्या माळरानावर 50 गुंठे खडकाळ शेती आहे. या भागामध्ये ताकारी उपसा सिंचन योजनेचे मुबलक पाणी आहे. गुरव आपल्या शेतामध्ये नेहमी उसाचे पीक घेत होते. परंतु शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत समजल्या जाणाऱ्या उसाच्या शेतीतून वर्षातून एकदाच पैसा मिळतो. अल्पभूधारक असणाऱ्या प्रकाश गुरव यांना वर्षातून एकदाच आर्थिक उत्पन्न देणारे पीक फायदेशीर वाटत नव्हते. म्हणूनच त्यांनी कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाचा विचार केला. यातूनच त्यांना सातारा जिल्ह्यातील पाली गावचे भाचे युवा शेतकरी अक्षय इंजेकर यांनी शेवंती फुलशेती बाबत माहिती दिली.
advertisement
भाच्याच्या सल्ल्याने प्रकाश यांनी ऊस पिक काढून शेवंती फुलवण्याचा धाडसी निर्णय घेतला. श्रावण महिन्यामध्ये शेवंतीची लागवड करताना यंदाच्या अवकाळी पावसाचा त्यांना सामना करावा लागला. अति पावसामुळे 20 ते 25 दिवस नुकतीच लागवड केलेली शेवंतीची रोपे मोठ्या कष्टाने त्यांनी जगवली. खडकाळ माळरान असल्याने सततच्या पावसात ही शेवंती फुलवणे त्यांना शक्य झाले.
advertisement
अशी फुलवली शेवंती
आपल्या 50 गुंठे शेतामध्ये त्यांनी मशागत करून उंच बेड आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. यामध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या आकर्षक शेवंतीची 15 हजार रोपे लावली आहेत. प्रकाश गुरव यांनी आई-वडील, पत्नी, मुलगा सर्व कुटुंबाच्या साथीने शेवंतीच्या रोपांची चांगली जोपासना केली आहे. वेळोवेळी भाच्याचे मार्गदर्शन आणि गुरव कुटुंबाची मेहनत यातून 3 महिन्यात शेवंती फुलाचे उत्पादन सुरू झाले.
advertisement
सुरुवातीला त्यांना 70 रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्यानंतर मार्केट वाढत त्यांना 100 रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळतो आहे. सध्या कमी तापमान असल्याने शेवंती फुलासाठी पोषक वातावरण आहे. यासह योग्य व्यवस्थापन आणि पिकाची निगा राखल्याने प्रकाश गुरव यांचा शेवंती प्लॉट फुलांनी लगडला आहे. 50 गुंठ्याच्या प्लॉटमधून 9 टन फुले निघाली असून यातून त्यांना जवळपास साडेसात लाख रुपये उत्पन्न मिळाले. लागवड मजुरी व वाहतूक असा त्यांना दीड लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना 6 लाखांचा भरघोस नफा मिळाला आहे.
advertisement
मुळातच शेवंतीचे फुलझाड भरघोस उत्पन्न देणारे आहे. त्यातच गुरव यांची पाण्याचा निचरा होणारी जमीन असल्याने यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असले तरीही त्यांना त्याचा आर्थिक फटका बसला नाही. जास्त पावसाने आणि पावसाळी हवामानाने झाडांची उंची कमी राहिली आहे. परंतु वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे सर्व झाडे जगवण्यात आणि फुलवण्यात यश आले असल्याचे प्रकाश गुरव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
शेवंती विक्रीसाठी निवडली मुंबई बाजारपेठ
फुल विक्रीसाठी त्यांनी स्थानिक मार्केटसह मुंबई बाजारपेठे निवडली आहे. मुंबई येथे फुलांची जास्त आवक असते. कधी मार्केट 10-20 वर ही येते तर कधी 200 ही पार करते. सरासरी 100-120 रुपये किलोमागे भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंबाच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना
शेवंती फुलाला भरपूर उत्पन्न मिळते परंतु फुले तोडण्यासाठी रोजगाऱ्यांचा मोठा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतो. फुले दिसायला नाजूक आणि आकर्षक असली तरीही त्याचे वजन फारसे भरत नाही. केवळ रोजगारी लावून शेवंती फुलवल्यास फारसा आर्थिक नफा मिळत नाही. म्हणूनच प्रकाश गुरव सहकुटुंब शेवंतीच्या मळ्यामध्ये राबत असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत उत्पन्नाचा मार्ग सोडून धाडसाने पीक बदलले. आणि पाच महिन्यात 6 लाखांचा आर्थिक गोडवा चाखता आल्याने गुरव परिवाराने समाधान व्यक्त केले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 24, 2024 9:19 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
भाच्याचा सल्ला मामाने ऐकला, 50 गुंठे खडकाळ माळरानावर फुलवली शेवंतीची शेती, 6 लाखांचा नफा