जालना : बियाणे उद्योगाची राजधानी म्हणून जालना शहराची ओळख आहे. वेगवेगळ्या बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या शहरात आहेत. त्याचबरोबर शेतकरी देखील विविध प्रकारचे बीजोत्पादन आपल्या शेतामध्ये करत असतात. कांद्याच्या बियाचे बीजोत्पादन जिल्ह्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून करत आला आहे. मात्र मागील तीन वर्षात कांद्याच्या बियाला मिळत असलेला अत्यल्प दर लक्षात घेता शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी कांदा लागवडीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळालं. यंदा मात्र शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे वाढला आहे. पाहुयात जालना शहरातील बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्रीची स्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल का वाढलाय.
advertisement
तीन वर्षांआधी म्हणजेच कोरोना येण्याआधी जालना शहरातील बाजारपेठेतून तब्बल 100 ते 150 टन कांद्याची दररोज विक्री व्हायची. तर कांदा बियाचे दर पडल्यानंतर हीच विक्री 20 ते 25 टनापर्यंत खाली आली. मागील तीन वर्ष दररोज दहा ते 25 टनाच्या दरम्यान कांद्याची विक्री होत असे. यावर्षी मात्र कांदा विक्रीचे प्रमाण वाढलं असेल तर रोज 50 ते 60 टन कांद्याचे विक्री होत आहे. या कांद्याला शेतकरी 600 रुपये प्रति क्विंटल ते 1200 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करत आहेत. जालना शहरामध्ये नाशिक, नगर, सोलापूर सांगली अशा भागामधून कांदा येत आहे. तर दररोजच्या वापरातील कांदा हा 2 हजार रुपये क्विंटल पासून 5 हजार रुपये क्विंटल पर्यंत विक्री होत आहे.
एक एकरमध्ये 90 दिवसांत 2 लाखांचा नफा, हे पीक ठरलं बीडमधील शेतकऱ्यासाठी वरदान, Video
जालना शहरात कांदा खरेदी करण्यासाठी जालना जिल्ह्याबरोबरच बुलढाणा आणि परभणी या दोन जिल्ह्यातून देखील शेतकरी येत आहेत. यावर्षी कांद्याच्या बियाला चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड वाढवत आहेत. सरकारने कांदा निर्यातीसाठी अनुदान दिल्यास किंवा कांद्याची आयात बंद केल्यास कांद्याच्या बियाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा जालन्यातील व्यापारी जावेद अहमद यांनी व्यक्त केली.
आम्ही दरवर्षीच बियाणे साठी कांद्याची लागवड करत असतो. कांदा बीयाला कधी चांगला दर मिळतो तर कधी फार कमी दरात विक्री करावी लागते ही एक प्रकारची लॉटरीच असते. कल पाहून याची विक्री आम्ही करतो. यावर्षी बरेच शेतकरी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांद्याची खरेदी करून शेतात लागवड करत आहेत. मी सुद्धा दहा क्विंटल कांद्याची खरेदी केली असून अर्धा एकर क्षेत्रावर त्याची लागवड करणार असल्याचे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पिंटू राठोड यांनी सांगितलं.





