चऱ्होळी गाव आळंदीपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेले एक प्राचीन आणि इतिहासपरंपरेने समृद्ध गाव आहे, जे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. बाबाराजे तापकीर पाटील यांनी सांगितले की, तापकीर घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विविध लढायांमध्ये सक्रिय होते. त्यांचे योगदान स्वराज्याच्या संरक्षणात मोलाचे होते. पानिपतच्या लढाईतही तापकीर घराण्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे ते सांगतात. गावात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात ज्या त्या काळाच्या परंपरेची साक्ष देतात.
advertisement
भिकारदास मारुती मंदिर, तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रात कुठे? 215 वर्षे आहे जुनं!
या गावात हे पाहू शकता.
चऱ्होळी गावात येताना तुम्हाला जुन्या इतिहासाची झलक सहज अनुभवता येते. गावात तापकीर पाटील घराण्याचे जुने वाडे आणि त्यांचे अवशेष पाहायला मिळतात, ज्यातून त्या घराण्याच्या परंपरेची आणि जुन्या काळातील वास्तुकलेची माहिती मिळते. वाघेश्वर मंदिर, खुरेश्वर महादेव मंदिर आणि काळभैरव मंदिर ही प्राचीन मंदिरे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतात.
ज्ञानेश्वर माऊलींचा पदस्पर्श
गावात अजूनही काही जुनी घरे आणि पारंपरिक वास्तू टिकून आहेत, ज्यामुळे जुन्या काळातील जीवनशैली जाणून घेता येते. या गावाशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध देखील जोडला जातो. स्थानिक माहितीप्रमाणे, संत ज्ञानेश्वर महाराजांची मावशी या गावात राहत होत्या, आणि ज्ञानेश्वर महाराज अनेक वेळा या गावात येऊन गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लढाईत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचा साठा देखील तुम्हाला येथे पाहायला मिळतो. त्यामुळे चऱ्होळी हे गाव इतिहास, परंपरा आणि अध्यात्म यांचा अनुभव घेण्यास योग्य ठिकाण आहे. तुम्ही देखील या गावाला भेट देऊन समृद्ध ऐतिहासिक वारसा जाणून घेऊ शकता.





