कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने पुणे व सातारा घाटमाथ्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
विदर्भ
विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. पावसासोबत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यांत मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि सुमारे 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट लागू आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला गेला आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी खरीप पिके व भाजीपाल्याचे रक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. जसे की,
भाजीपाला संरक्षण – सध्या भाजीपाला पीकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये वांगी,टोमॅटो,मिरची,भेंडी यांसारख्या इतर पिकांमध्ये पाणी साचल्यास मुळकुज व कीडरोग वाढू शकतो, त्यामुळे ओलसरपणा कमी करण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) करावे. तसेच काकडी, दोडका, भोपळा यांसारख्या पिकांचे फळ पिकल्यावर लगेच काढून घ्यावे, अन्यथा पावसामुळे सडण्याची शक्यता आहे.
खत व्यवस्थापन – जास्त पावसात खतांचा अपव्यय टाळण्यासाठी पावसानंतरच द्रवरूप खतांची फवारणी करावी.
किडरोग नियंत्रण – पावसाळ्यात पानांवर डाग, कूज किंवा बुरशीजन्य रोग वाढतात. आवश्यक असल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
धान पीक व्यवस्थापन – धानाच्या रोपांना पाण्याचा पुरवठा नियंत्रित ठेवावा, तसेच जास्त पाणी झाल्यास निचऱ्याची सोय करावी.