बीड : आजच्या धावपळीच्या जीवनात नोकरी आणि शेती या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणे अनेकांना कठीण वाटते. मात्र बीड जिल्ह्यातील विजय राठोड या तरुणाने हे आव्हान स्वीकारून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. फक्त 15 हजार रुपयांची नोकरी आणि घरची केवळ एक एकर शेती एवढ्या मर्यादित साधनांमध्येही त्यांनी अपार मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे.
advertisement
विजय यांनी आपल्या शेतीसाठी पारंपरिक पिकांऐवजी अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची निवड केली. त्यांनी राजमा या पिकाची लागवड केली कारण हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देते. रब्बी हंगामात तीन महिन्यांच्या आत राजमा पीक तयार होते. बाजारात त्याला चांगली मागणी असते. विजय यांनी योग्य नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि कष्टाच्या जोरावर कमी क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवलं.
देशी गाई सांभाळा, अथवा आमच्याकडे द्या! 28 वर्षांपासून नाशिककराची गोसेवा!
15 हजार रुपयांच्या नोकरीतून घर चालवणं आणि शेतीची जबाबदारी सांभाळणं सोपं नव्हतं. मात्र विजय यांनी नोकरीच्या वेळा सांभाळून शेतीकडे लक्ष दिलं. वेळेचं व्यवस्थापन आणि चिकाटीने काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांना हे साध्य करता आलं. त्यांनी शेतीसाठी हवामान, जमिनीचा पोत, बी-बियाण्यांची निवड आणि सिंचन यावर विशेष लक्ष केंद्रित केलं.
राजमा पिकाच्या माध्यमातून विजय दरवर्षी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. एका एकर क्षेत्रात तीन महिन्यांत त्यांनी तब्बल 2 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेची माहिती आणि मेहनत या तीन गोष्टींनी हे यश शक्य झालं आहे. कमी क्षेत्रफळात अधिक उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न दरवर्षी यशस्वी ठरत आहे, असं विजय राठोड यांनी सांगितलं.
विजय राठोड यांनी त्यांच्या शेतीसाठी पुढील काही योजनाही आखल्या आहेत. ते नवीन प्रकारच्या पिकांची लागवड करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे उत्पन्नात आणखी वाढ होईल. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवून अधिक प्रमाणात उत्पादन घेणं शक्य आहे, असं विजय राठोड यांनी सांगितलं.
विजय राठोड यांची ही प्रेरणादायी कथा आजच्या तरुण शेतकऱ्यांना नव्या दिशेनं मार्ग दाखवणारी आहे. नोकरीसोबत शेती करणाऱ्या विजय यांनी मेहनतीचा व चिकाटीचा आदर्श घालून दिला आहे. अशा उदाहरणांमुळे शेतीत स्वावलंबी बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो.