रोगाची कारणे
लम्पी स्किन डिसीज हा कॅप्रिपॉक्स व्हायरसमुळे होतो. हा विषाणू डास, माश्या आणि गोचीड यांसारख्या किटकांद्वारे पसरतो. दूषित पाणी, चारा किंवा आजारी जनावरांच्या थेट संपर्कातूनही संक्रमण होते. भारतात 2019 पासून हा रोग आढळून आला असून, 2025 मध्ये महाराष्ट्रात पुन्हा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे.
प्रमुख लक्षणे काय?
या आजाराची सुरुवात प्रामुख्याने तापाने होते. त्यानंतर जनावरांच्या त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटरपर्यंतच्या गाठी (नोड्यूल्स) दिसून येतात. लिम्फ नोड्स सुजणे, भूक कमी होणे, दूध उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत घट होणे अशी लक्षणे दिसतात. गंभीर अवस्थेत गर्भपात होऊ शकतो किंवा जनावरांना अत्यंत अशक्तपणा येतो. दुर्लक्ष झाल्यास मृत्यूची शक्यताही वाढते.
advertisement
निदानाची पद्धत
लम्पी स्किन डिसीजचे निदान मुख्यतः क्लिनिकल लक्षणांवर आधारित केले जाते. तसेच त्वचेच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण किंवा हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीद्वारे रोग निश्चित केला जातो. प्रारंभिक टप्प्यावरच पशुवैद्यकांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
प्रतिबंधात्मक उपाय
या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे :
गोठ्यांमध्ये जाळ्या लावून किटकांचा प्रादुर्भाव टाळावा. नवीन जनावरे खरेदी करताना त्यांना काही दिवस विलगीकरणात ठेवावे. दूषित पाणी व पशुखाद्य टाळून गोठ्यांची नियमित स्वच्छता करावी.
लसीकरण मोहीम राबविणे अत्यंत महत्त्वाचे असून गोटपॉक्स लस प्रभावी ठरते. पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली अँटिबायोटिक्स व दाहक-विरोधी औषधे द्यावीत. गोठ्यात कडूनिंबाच्या पानांचा धूर करून किटकांना दूर ठेवता येते.
दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योग्य वेळी उपचार व प्रतिबंधात्मक पावले उचलल्यास या आजाराचा परिणाम कमी करता येतो. मात्र दुर्लक्ष केल्यास दूध उत्पादन घटून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.