मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ वॉर सुरू असताना नुकताच मुंबईतून डाळिंबाचा एक कंटेनर अमेरिकेला पाठवण्यात आला आहे. 2017-18 पासून ही निर्यात काही कारणास्तव बंद होती. मात्र आता ही निर्यात पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
टॅरिफ वॉर सुरू असताना डाळिंबाची निर्यात कशी खुली केली?
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी फळे, बीफ, चहा, कॉफी यासारख्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा केली असून त्याबाबतच्या निर्णयावर स्वाक्षरीही केली आहे. आणि याचा फायदा भारतालाही झाला. भारतातून अमेरिकेत फळे जास्त प्रमाणात निर्यात केले जातात.
अमेरिका भारतातून डाळिंब का आयात करतो?
भारत हा जगातील सर्वात मोठ्या डाळिंब उत्पादक देशांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत उच्च प्रतीचे डाळिंब मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विशेषतः ‘भगवा’ जातीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. या जातीचा रंग आकर्षक, दाणे गडद लाल, चव गोड-आंबट आणि साठवण क्षमता चांगली असल्याने अमेरिका भारतीय डाळिंबाला प्राधान्य देते.
वर्षभर पुरवठ्याची क्षमता
अमेरिकेत डाळिंबाचे उत्पादन हंगामी आणि मर्यादित आहे. मुख्यतः कॅलिफोर्नियामध्ये उत्पादन होते, पण ते वर्षभर उपलब्ध नसते. भारतात मात्र मृग, हस्त आणि आंबिया बहार या पद्धतींमुळे वर्षभर डाळिंब उपलब्ध राहते. त्यामुळे अमेरिकेला ऑफ-सीझनमध्ये भारताकडून डाळिंब आयात करणे सोयीचे ठरते.
दर्जा आणि निर्यात मानके
भारतीय डाळिंब APEDA आणि USDA च्या दर्जा व अन्नसुरक्षा निकषांनुसार प्रक्रिया करून निर्यात केले जाते. वाष्प-उष्णता उपचार (VHT), कोल्ड ट्रीटमेंट, अवशेषमुक्त उत्पादन (Residue-free) आणि ट्रेसिबिलिटी यामुळे अमेरिकेचा विश्वास भारतीय डाळिंबावर वाढला आहे.
शेतकऱ्यांना काय फायदा होणार?
गेल्या काही दिवसांपासून विशेषत: महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. हे पीक प्रामुख्याने नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. दिवसेंदिवस वाढणारी रोगराई आणि मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे राज्यात डाळिंब शेतीचे प्रमाण कमी झालं. त्याचा परिणाम बाजार भावावर दिसून आला. अशातच आता पुन्हा अमेरिकेने निर्यात खुली केल्याने शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण झाली आहे. शेतकरी पुन्हा एकदा डाळिंब शेतीकडे मोठा प्रमाणात वळला जाणार आहे.
