कोन्हेरी गावात राहणाऱ्या रेवणसिद्ध शेळके यांची पाच एकर शेती आहे. शेती करत असताना शेती पिकातून अधिक उत्पन्न मिळत नव्हते. म्हणून रेवणसिद्ध यांनी पशुपालन करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला एका गायीपासून त्यांनी पशुपालनास सुरुवात केली. गायीपासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली.
advertisement
गायीच्या दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून आणि शेतीतून मिळालेल्या नफ्यातून रेवणसिद्ध यांनी नऊ गायीची खरेदी केली. आज रेवणसिद्ध यांच्या गोठ्यात 10 गायी असून त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून ते सर्व खर्च वजा करून वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांची कमाई करत आहेत. गायीना सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा मका, ऊस आणि कडबा खाण्यासाठी दिला जातो. तर गायीना कोणताही आजार होऊ नये यासाठी प्रत्येक सहा महिन्याला गायीना लसीकरण केले जाते.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गायीना मच्छर पासून बचाव व्हावा यासाठी त्यांच्या गायीच्या गोठ्यात पाच ते सहा फॅन बसवण्यात आले आहेत. शेळके यांच्या गोठ्यात असलेल्या एका गायीची किंमत एक ते दीड लाख रुपये पर्यंत आहे. दररोज सकाळ आणि संध्याकाळी एका गायीपासून वीस ते पंचवीस लिटर दूध मिळते.
सध्या गायीच्या दुधाला 45 ते 60 रुपये प्रति लिटर दर मिळत असून एका गायीपासून सुरू केलेल्या या दूध व्यवसायातून वर्षाला सर्व खर्च वजा करून 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न रेवणसिद्ध शेळके यांना मिळत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन केल्यास अधिक नफा मिळेल, असा सल्ला बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले रेवणसिद्ध शेळके यांनी दिला आहे.





