गोकुळाष्टमीचे महत्त्व -
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीवर जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यांनी पृथ्वीवरील दुष्ट शक्तींचा नाश केला. त्यामुळे या दिवशी बाळकृष्णाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राज्यात विविध ठिकाणी दहीहंडी फोडून हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाला लोणी आणि दही खूप आवडत होते, त्यामुळे ते हंडीतून लोणी चोरून खात असत. याच आठवणीसाठी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
advertisement
जन्माष्टमीला काय-काय करतात?
जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करावा. हा उपवास रात्री 12 वाजता कृष्णजन्म झाल्यावर सोडला जातो. काही लोक दिवसभर फलाहार घेतात. घरांमध्ये बाळकृष्णाची मूर्ती किंवा पाळणा सजवला जातो. यासाठी फुले आणि मोरपिसांचा वापर केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाला आवडणारे पदार्थ म्हणजे लोणी, दही, दूध, खीर इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो. गोकुळाष्टमीला अनेक ठिकाणी सुंठवडा हा खास पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे.
जन्माष्टमीनंतर शुक्र-बुधाचा शुभ संयोग! लक्ष्मी-नारायण योगात 3 राशींचे फावणार
जन्माष्टमीची पूजा विधी -
जन्माष्टमीची पूजा रात्री 12 वाजता करण्याची परंपरा आहे, कारण त्याच वेळी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. रात्री 12 वाजण्याआधी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेच्या ठिकाणी पाळणा ठेवून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. मूर्तीला पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल) आणि शुद्ध पाण्याने अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून नवीन वस्त्र, दागिने आणि मोरपीस लावून शृंगार करावा. या दिवशी पूजेत काकडी असणे महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, काकडी ही माता देवकीच्या गर्भाशयाचे प्रतीक मानली जाते. मध्यरात्री देठासह काकडी कापून बाळकृष्णाला जन्म झाल्याचे प्रतीक दाखवले जाते. तयार केलेला नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करावा. त्यानंतर धूप, दीप लावून आरती करावी. रात्रभर श्रीकृष्णाची भजने आणि भजन-कीर्तन केले जाते. अशा प्रकारे, जन्माष्टमी हा सण अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)