गेल्या काही वर्षांत पुण्यात ईव्ही वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात सध्या सुमारे दीड लाखांहून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत. पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीसाठी ईव्हीचा पर्याय निवडला जात असला, तरी उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे या वाहनांच्या बॅटरीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
ईव्ही वाहनांची बॅटरी ही तापमानास अत्यंत संवेदनशील असते. जास्त उष्णतेमुळे बॅटरीचे आयुष्य कमी होण्याबरोबरच तिच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. काही वेळा बॅटरीचे तापमान नियंत्रित न राहिल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वाहन नेहमी सावलीत पार्क करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात दीर्घकाळ गाडी ठेवल्यास तिच्या तापमानात मोठी वाढ होते.
advertisement
चार्जिंग करतानाही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन शक्यतो थंड वातावरणात, म्हणजे पहाटे किंवा रात्री चार्ज करणे अधिक सुरक्षित मानले जाते. उन्हाच्या तीव्र वेळेत चार्जिंग टाळावे. तसेच गाडी पूर्णपणे 100 टक्के चार्ज करण्याऐवजी 80 ते 90 टक्क्यांपर्यंतच चार्ज ठेवणे बॅटरीसाठी फायदेशीर ठरते. वारंवार फास्ट चार्जिंग केल्यास बॅटरी लवकर गरम होते, त्यामुळे नॉर्मल चार्जिंगचा वापर अधिक करावा, असं योगेश सर्जेराव सांगतात.
तसेच बॅटरीचे तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असावे. वाहन जास्त गरम झाल्यास ते इशारा देते, अशावेळी गाडी थांबवून थोडा वेळ थंड होऊ द्यावे. उन्हातून आल्यावर लगेच चार्जिंग न करता किमान 15 ते 20 मिनिटांचा अवधी द्यावा. याशिवाय, वाहनाच्या वायरिंगची नियमित तपासणी करणेही महत्त्वाचे आहे. उंदरांमुळे वायरिंग खराब होण्याच्या घटना घडतात, ज्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागू शकते. घरी चार्जिंग करताना वाहन मीटर किंवा जास्त लोड असलेल्या ठिकाणाजवळ ठेवू नये.
तसेच, वाहनाचे सॉफ्टवेअर नियमित अपडेट ठेवणे आणि वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. यामुळे बॅटरीचे तापमान व्यवस्थापन योग्य राहते आणि अपघाताचा धोका कमी होतो, असेही योगेश सर्जेराव यांनी सांगितले.
एकूणच, ईव्ही वाहनांचा सुरक्षित वापर करण्यासाठी योग्य देखभाल आणि काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात विशेष खबरदारी घेतल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.





