मुंबई: मोठ्या स्वप्नांची सुरुवात लहानशा पावलांनी होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतील दहिसरची कोमल जाधव होय. 9 वर्षे नोकरी करूनही समाधान न मिळाल्याने तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कौशल्याच्या जोरावर तिने टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या डिझाइन्सना मोठी मागणी असून, मराठी चित्रपटसृष्टीतही तिला काम करण्याची संधी मिळाली आहे.
advertisement
27 वर्षीय कोमल जाधव दहिसर पूर्व येथे आपल्या कुटुंबासोबत राहते. 5 भावंडांमध्ये ती लहान असून ती लहानपणापासूनच मेहनती आणि जिद्दी स्वभावाची आहे. तिच्या तीन मोठ्या बहिणींची लग्नं झाली आहेत. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिला पुढे शिकायचं होतं, पण घरच्या परिस्थितीमुळे तिला नोकरी करावी लागली. तिने 9 वर्षे नोकरी केली, जिथे तिला 5 हजार ते 10 हजार रुपये पगार मिळायचा. मात्र, नोकरीत समाधान न मिळाल्याने तिने काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.
फॅमिली असो की पार्टनर, फक्त 799 रुपयांत करा पार्टी, ठाण्यात कुठं आहे अजब कॅफे का गजब थिएटर ?
फॅशन डिझायनिंगचा प्रवास
नोकरीसोबतच कोमलने शिवणकाम शिकण्यास सुरुवात केली. हळूहळू तिच्या हातातील कौशल्याला ओळख मिळू लागली. सुरुवातीला तिने घरीच कपडे शिवायला सुरुवात केली. तिला ग्राहक मिळू लागले. त्यानंतर तिनं एक लहानसं दुकान भाड्यानं घेतलं आणि तिथं स्वतःचं टेलरिंग सेंटर सुरू केलं.
डिझाईनर कोमल ब्रँड
आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी कोमलने पुण्यात जाऊन फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. मुंबईत तिला स्वतःच फॅशन डिझाईन्सचे दुकान उघडायचं होत. जवळपास परवडेल असा दुकान गाळा ती 4 महिने शोधत होती. तिने दहिसरच्या रावळपाडा इथं एक छोटी जागा भाड्याने घेतली आणि तिथे 'डिझाईनर कोमल' हे आधुनिक टेलरिंग आणि डिझायनिंग सेंटर सुरू केलं आणि स्वतःचा नवीन ब्रँड तयार केला.
दुकानाच्या आकर्षक सजावटीसाठी तिने 60 ते 70 हजार रुपये गुंतवले. सुरुवातीचे काही दिवस तणावाचे होते, पण आई-वडिलांचा पाठिंबा आणि आत्मविश्वासामुळे तिने हे काम यशस्वीपणे सुरू ठेवलं. ती लग्नासाठी, पार्टीसाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी भाड्याने ड्रेसही देते. तसंच ग्राहकांच्या आवडणीनुसार त्यांना हव्या त्या डिझाईन्समध्ये ड्रेसेस शिवून देते. कोमलने व्यवसाय सुरू करून काही महिनेच झाले आहेत, पण तिच्या मेहनतीमुळे आणि उत्तम कलाकौशल्यामुळे तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या ती महिन्याला 15 ते 20 हजार रुपये कमावते.
चित्रपटसृष्टीत मिळाली संधी
कोमलच्या मेहनतीमुळे तिच्या कामाची मोठी ओळख निर्माण झाली. तिच्या डिझाईन्सना चांगली मागणी येऊ लागली. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी चित्रपटाची वेशभूषा तिने केली होती. हा तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
यशस्वी उद्योजिकेचा प्रवास
आज कोमल फक्त एक टेलर नाही, तर यशस्वी उद्योजिका आणि फॅशन डिझायनर आहे. तिची मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यामुळे तिने आपल्या स्वप्नांना साकार केलंय. तिची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.





