मुंबई: कला ही केवळ आवड न राहता संधीचं दारही ठरू शकते, हे पायल खिलारीने सिद्ध केलं. पायलने कधी कल्पनाही केली नव्हती की एक साधा व्हिडिओ तिच्या आयुष्याला वेगळी दिशा देईल. सोशल मीडियावर शेअर केलेली कलाकृती पाहता पाहता लाखोंच्या मनात घर करून गेली. आज तिच्या कलेला मोठी मागणी मिळू लागलीय आणि ती आपला व्यवसाय यशस्वीपणे वाढवत आहे.
advertisement
बोरिवलीतील 21 वर्षीय पायल खिलारीच्या बाबतीतही असंच घडलं. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या पायलला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. ती केवळ रंगांमध्ये रमणारी नव्हती, तर प्रत्येक सण-उत्सवाला आपल्या कलेच्या माध्यमातून घर सजवणे, लग्नात रुखवत तयार करणे किंवा पोर्ट्रेट तयार करणे हे तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होतं. तिच्या कलाकृतींमध्ये बारकावे, कल्पकता आणि पारंपरिकतेचा सुंदर मिलाफ असायचा. मात्र, एका साध्या व्हिडिओने तिच्या या छंदाला संधीचे पंख दिले.
जेवणावरनं व्हायची नवऱ्यासोबत भांडणं, बायको वैतागली अन् घेतला निर्णय, आता पैसाच पैसा!
सुपावर काढलेले चित्र व्हायरल
पायलने आपल्या मोठ्या बहिणीच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी सुपावर सुंदर चित्र काढलं. पारंपरिक नवरा-नवरीच्या चित्राला तिने नवनवीन शैलीत साकार केले आणि ते पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करून गेले. या कलाकृतीचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. अवघ्या काही दिवसांतच हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. पायलच्या कलेचे कौतुक सुरू झाले आणि पाहता पाहता तिला अनेक ऑर्डर्स मिळू लागल्या.
लग्नातील रुखवत, बाळांचे नामकरण, गृहप्रवेश किंवा खास भेटवस्तू यासाठी लोक तिच्याशी संपर्क साधू लागले. काही जणांनी पारंपरिक डिझाइन्स मागितल्या, तर काहींनी खास ऑर्डरनुसार कलाकृती बनवण्याची विनंती केली. पायलने आपल्या कलेला केवळ छंद न ठेवता व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू तिच्या मेहनतीचं चीज होऊ लागलं.
छंदाचं व्यवसायात रूपांतर
पायल आज आठवड्याला 8 हजार रुपयांहून अधिक कमाई करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने स्वतःचं ब्रँडिंग केलं, आपला व्यवसाय वाढवला आणि एका साध्या छंदाला कमाईच्या मार्गावर नेलं. तिच्या कल्पकतेच्या जोरावर ती आता यशस्वी उद्योजिकेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतर देता येते, हे पायलने सिद्ध करून दाखवले आहे. तिची ही यशस्वी वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.