छत्रपती संभाजीनगर : नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे पुढील शिक्षणाचे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झालीय. दहावी, बारावीनंतर काय करावे? हा मोठा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. जर तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही फाईन आर्ट्समध्ये अॅडमिशन घेऊन तुमचं करिअर करू शकता. फाईन आर्ट्सला अॅडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या कोणत्या संधी आहेत आणि यामध्ये कोण कोणते कोर्स आहेत? या विषयी छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे यांनी माहिती दिलीय.
advertisement
दहावी, बारावीनंतर कोर्स
तुम्ही फाईन आर्ट्समध्ये दहावी आणि बारावीनंतर देखील प्रवेश घेऊन विविध कोर्स करू शकता. यामध्ये तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी आहेत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी देखील उपलब्ध असून अगदी आयटी क्षेत्रामध्ये देखील काम करू शकता. यामध्ये आर्ट डिझाईन, इंटेरियर, बी. एफ. एक्स, ॲनिमेशन पेंटिंग, शिल्पकला, कमर्शियल आर्ट असे विविध कोर्स आहेत. जर तुम्हाला बारावीनंतर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही पदवीसाठी प्रवेश घेऊ शकता. जर तुम्हाला दहावीनंतर प्रवेश पाहिजे असेल तर विविध डिप्लोमा कोर्सेस करू शकता, असे प्राचार्य तोरवणे सांगतात.
हे कोर्स आहेत उत्तम पर्याय
डिप्लोमामध्ये फाउंडेशन कोर्स, दोन वर्षाचा आर्ट टीचर कोर्स, त्यानंतर जीडी आर्टचा चार वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. तसेच इंटरियर डिझाईनचा दोन वर्षांचा डिप्लोमा देखील आहे. जीडी पेंटिंग, जी डी शिल्पकला टेक्सटाईल डिपार्टमेंट असे देखील कोर्स यामध्ये आहेत. हे कोर्स डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला बारावीनंतर पदवी घ्यायची असेल तर सीईटी देऊन प्रवेश घ्यावा लागेल. दहावीनंतर डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घ्यावा लागेल, असेही प्राचार्यांनी सांगितले.
या विविध कोर्सेससाठी साडेपाच हजारांपासून ते 20 हजारांच्या दरम्यान प्रवेश फी आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कोणताही फाईन आर्ट्सचा कोर्स तुम्ही अगदी कमी फीमध्ये करू शकतो. तसेच भविष्यातील करिअरच्या चांगल्या संधी मिळवू शकता.





