जालना : वैद्यकीय प्रवेशासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून अनेकांनी तर पैकीच्या पैकी गुण मिळवलेत. जालन्यातील एका सामान्य शेतकरी पुत्राने त्याचं एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या गणेश मुळे याने नीट परीक्षेत 618 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेश निश्चित केला आहे. या निमित्ताने गावातून पहिला एमबीबीएससाठी पात्र होण्याचा मान गणेश मुळे याने मिळवलाय.
advertisement
दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश
गणेश जगन्नाथ मुळे हा जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव या गावचा रहिवाशी असून त्याचे वडील जगन्नाथ मुळे हे वडिलोपार्जित सात एकर शेती करतात. याच शेतीच्या बळावर त्यांनी आपल्या तीनही आपत्यांना उच्चशिक्षित केले. जगन्नाथ मुळे यांचा गणेश हा दुसरा आपत्य आहे. पहिल्या प्रयत्नात गणेश याला 472 गुण मिळाल्याने त्याची एमबीबीएसला प्रवेश घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली मात्र वडिलांच्या पाठबळाने त्याने आणखी एक चान्स घेण्याचा निर्णय घेत पुन्हा नीट परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी लातूरला जाऊन सात ते आठ तास दररोज अभ्यास केला. ज्या कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या त्या क्लिअर करून घेतल्या. त्यामुळे नीट परीक्षेचा पेपर त्याला अतिशय सोपा गेला आणि नुकत्याच लागलेल्या निकालात त्याला 720 पैकी 618 गुण मिळालेत. त्यामुळे एमबीबीएसला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
शाब्बास पोट्टेहो, NEET परीक्षेत मिळवले पैकीच्या पैकी गुण, नागपूरच्या दोघांची कमाल
वडिलांचं पुन्हा परीक्षा देण्यासाठी पाठबळ
पहिल्यांदा मला नीट परीक्षेत अपयश आलं होतं मात्र वडिलांनी पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी पाठबळ दिलं. लातूरला जाऊन दररोज सात ते आठ तास अभ्यास केला यादरम्यान स्मार्टफोन न वापरता साधा फोन वापरला. ज्या संकल्पना समजल्या नव्हत्या त्या व्यवस्थित समजून घेतल्याने हे यश मिळालं असून गावातील पहिला एमबीबीएस डॉक्टर होणार असल्याने वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला आनंद झालाय, असं गणेश मुळे याने सांगितलं.
नोकरी अन् व्यवसायाची दुहेरी संधी, दहावीनंतर घ्या ITI ला प्रवेश, पाहा संपूर्ण प्रक्रिया
शेती करणं शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले तरी देखील अनेक शेतकरी मुलांना शेतातील पैसे शिक्षणासाठी लावत आहेत. अनेक विद्यार्थी देखील त्यांच्या कष्टाचे चीज करत आहे. याचा आनंद वाटतोय शेतकऱ्यांची मुलं देखील उच्चशिक्षित होऊन उच्च पदावर बसू शकतात असा विश्वास या निमित्ताने मिळाल्याची भावना जगन्नाथ मुळे यांनी व्यक्त केली.





