कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील 21 विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रोची वारी करण्याची संधी मिळाली आहे. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 56 विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावलं आहे. यापैकी 21 विद्यार्थ्यांची बंगळुरू मध्ये असणाऱ्या इस्रोची भेट घडवून आणली जात आहे. विद्यार्थी विज्ञान आणि अंतराळ संशोधनाविषयी अभिव्यक्त व्हावेत, त्यांच्यात हा दृष्टीकोन घट्ट रूजावा यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. या विद्यार्थ्यांना केएमटीच्या वातानुकूलित सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल आपण लोकल18 च्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरच्या प्रफुल्ल कांबळे या विद्यार्थ्याने इंग्रजीत भाषण केले. त्याच्या अस्खलित इंग्रजी भाषेतील भाषणाने अधिकाऱ्यानीही कौतुक केले. या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. या भेटीत 'इस्रो'चे कामकाज, तेथील परिसर पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उपग्रहांकडून मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात, सॅटेलाईटपर्यंत कमांड कशा पाठवल्या जातात, 'इस्रो'चे विविध ऑपरेशन्सची लाईव्ह माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
'इस्रो'ला अभ्यास सहलीवर पाठविण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, उपायुक्त साधना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना केएमटीच्या वातानुकुलित बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. या विद्यार्थ्यांसोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना क्रीडाईतर्फे सूट व बूट उपलब्ध करून देण्यात आले.
महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत असणा-या शिक्षकांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर या गोष्टी घडून आल्या आहेत. इथून पुढेही कोल्हापूर महानगरपालिकांचे विद्यार्थी घवघवीत यश मिळवतील आणि त्यांना एक प्रेरणा मिळेल यासाठी हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांना नजिकच्या महानगरपालिका शाळेमध्ये प्रवेश घेऊन विविध संधींचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी नमूद केले.





