अमरावती : एखाद्याकडे सर्वकाही असूनही तो कारणे देऊन स्वतःची सांत्वना स्वतः करतो. तर एखाद्याकडे काहीच नसताना तो आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने साम्राज्य उभे करतो. आयुष्य जगायचं असेल तर संकटांचा सामना हा करावा लागतोच. पण, त्यालाही काही मर्यादा असाव्यात. आधी वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि काही वर्षातच आईचेही छत्र हरवले. म्हाताऱ्या आजीसोबत राहून खूप दिवस संघर्ष केला. आजीच्या निधनानंतर तर आयुष्य अजूनच खडतर झाले. लोकांच्या घरी धुणीभांडी करून अभ्यास करायचा. इतका अभ्यास करूनही अपयश आले म्हणून स्वतःला शिक्षा सुद्धा करून घेतली. शेवटी प्रयत्नाला यश मिळाले. ही गोष्ट आहे अमरावती मधील मोझरी या गावातील माधुरी सावंत या विद्यार्थिनीची. आलेल्या सर्व संकटांवर मात करून माधुरी हिने मुंबई पोलीस विभागात आपले स्थान पक्के केले आहे.
advertisement
अमरावतीमधील मोझरी येथील माधुरी सावंत या विद्यार्थिनीसोबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा माधुरी सांगते की, माझ्या परिस्थितीने मला घडवले. मी वर्ग चौथीला असताना वडिलांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर आई आजारी पडली आणि 1 ते 2 वर्षात आईची साथ सुद्धा सुटली. त्यानंतर आजी आणि मी सोबत राहत होतो. तेव्हाही खूप संकटं आलीत, म्हणून मला गावातील नर्स अल्का शिरसाट यांनी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून दिली. वर्ग दहावीपर्यंत मी निवांत शिक्षण घेतले.
आई आणि वडिल दिव्यांग, मोलमजुरी करून तो झाला पोलीस, प्रदीपची जिद्दीची कहाणी!
लोकांच्या घरी धुणीभांडी करून शिक्षण
मात्र, हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर आणखी माझ्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर मला माझे मित्र मैत्रिणी, शेजारी आणि अल्का शिरसाट यांनी खूप मदत केली. त्यानंतर मला अल्का शिरसाट यांनी त्यांच्या घरी ठेवून घेतले. स्वतःच्या मुलीप्रमाणे माझा सांभाळ केला. त्याआधी मी लोकांच्या घरी अमरावतीमध्ये धुनीभांडी करत होती. त्यातून मिळणारे पैसे शिक्षणासाठी वापरत होती. अल्का शिरसाट यांनी जर मला त्यांच्या घरी ठेवून माझी मदत केली नसती, तर आजही मी कोणाकडे धुणीभांडी करत असती, असे माधुरी सांगते.
त्यानंतर माझे पोस्ट ग्रॅज्युएशनचे संपूर्ण शिक्षण हे एका फाउंडेशनने पूर्ण केले. मला अनेकांनी मदतीचा हात दिला म्हणून मी आज हे ध्येय पूर्ण करू शकले. 2 वर्षांपासून मी पोलीस भरतीची तयारी करत होते. खूप मेहनत केली, अभ्यास केला, माझ्या मित्रांनी माझा अभ्यास घेतला. त्यानंतर मी नागपूरला परीक्षा दिली. त्यात माझे सिलेक्शन झाले नाही. त्यामुळे मी स्वतः ला शिक्षा म्हणून माझ्या हाताला चटके दिले होते.
तेव्हाही मला सगळ्यांनी खूप समजावले आणि मी पुन्हा तयारीला लागले. आता मुंबई पोलीस विभागात शिपाई म्हणून माझी निवड झाली आहे. मला मदतीचा हात देणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. यापुढेही मला आणखी अभ्यास करायचा आहे आणि मोठा पोलीस अधिकारी व्हायचं आहे, असे माधुरी सांगते.