जानला: दगड फोडून आपल्या कुटुंबाचं उदरभरण करणारा समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा या समाजापासून कोसो दूर आहेत. भूमिहीन असल्याने या समाजातील अनेक मुलं दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पोटापाण्याची सोय बघतात. मात्र याच अत्यंत मागास समाजातील मुलाने एमपीएससी परीक्षेचं मैदान मारलं आहे. जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या खडक तलाव इथे राहणारा दीपक देवकर महसूल सहाय्यक झाला आहे. त्याच्या याच यशाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
शिवाजी देवकर हे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील मूळचे रहिवासी आहेत. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने ते जालना शहरातील खडक तलाव इथे स्थायिक झाले. मोठ मोठ्या खाणींतून दगड काढून ते फोडण्याचं काम शिवाजी देवकर करायचे. त्यांना एकूण चार मुले आहेत. त्यापैकी तीन मुले त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करतात. तर सर्वात धाकटा असलेला दीपक देवकर याला चांगलं शिकवण्याचा निर्धार शिवाजी देवकर यांनी केला.
दीपकचं महाविद्यालयीन शिक्षण जालन्यातच मत्स्योदरी महाविद्यालय येथे झालं. यानंतर वाणिज्य शाखेतून पदव्युत्त शिक्षण पुण्यात घेतलं. एम कॉम झाल्यानंतर सीए होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, चपरासी झाला तरी चालेल परंतु सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्याचं त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं. त्यामुळे दीपक याने एमपीएससीची वाट धरली. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात दीपकची महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे.
दगडफोडी करणाऱ्याचा मुलगा सरकारी नोकरदार झाल्याने कुटुंबीयांबरोबरच सगळ्यांनाच आनंद झाला आहे. परंतु, दीपकचं स्वप्न पोलीस उपअधीक्षक होण्याचं आहे. यासाठी त्याचा पुण्यात अभ्यास सुरूच आहे. “महसूल सहाय्यक हे पद मिळाल्याने अत्यंत आनंदी आहे. परंतु, माझं यावर समाधान झालेले नाही. कोणतीही पोस्ट हातात येणं गरजेचं होतं. ती मिळाल्याने आता पुढील तयारीसाठी अधिक बळ मिळालं आहे. सध्या राज्यसेवे मार्फत विविध परीक्षा देत आहे. प्रयत्नांना यश मिळालं तर लवकरच आणखी मोठं पद मिळवण्याची अपेक्षा आहे,” असं दीपकने सांगितलं.