मुंबई: स्वतःच्या कमकुवत बाजूंना कणखर बाजू बनणारे फार कमी लोक असतात. यापैकी एक मुंबईचे किरण पाटील. वयाच्या तिसऱ्या वर्षी अपंगत्व आलेल्या किरण पाटील यांनी स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेत घरची जबाबदारी सांभाळत स्वत:च्या कलेची आवड जोपासली आहे. किरण यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि रेल्वेच्या विविध परिक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन रेल्वेमध्ये नोकरी मिळवली. किरण यांना लिखाणाची आवड असल्यामुळे कविता या माध्यमातून त्यांनी त्यांची कला जगासमोर सादर केले. आता वेगवेगळ्या अल्बमसाठी गाणी लिहून ती संगीतबद्ध करतात. त्यांच्याच प्रेरणादायी प्रवासाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
सध्या किरण मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉप मध्ये सीनियर टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे. गेले 13 वर्षे ते रेल्वे विभागात नोकरी करत आहे. किरण यांनी दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर रेल्वेच्या इंटर्नशिपचा फॉर्म भरला आणि ती परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. चांगले गुण प्राप्त झाल्यामुळे अकरावी नंतर मग रेल्वेमध्ये इंटर्न म्हणून रुजू झाले. नंतर त्यांचा खरा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला. मुंबईला आल्यावर माटुंगा मध्ये किरण स्थायिक होते. तिथे त्यांची मुळ भाषा आगरी आणि मराठी भाषेतील अंतर जाणवले. किरणला इथे मोठा मित्र परिवार भेटला आणि त्यांनी इंग्रजी भाषा शिकवली. तसेच त्यांच्या भाषेतील त्रुटी दुर केल्या. इथूनच किरण यांनी लिखाणाला सुरवात केली.
इथं 2 दशकांपासून मराठी-अमराठी राहतात एकत्र, संकटातही असते एकमेकांना साथ!
आई-वडिलांमुळे घडलो
"मी अगदीच लहान होतो. जेव्हा मला अपंगत्व आलं. त्यामुळे मला कळायचं नाही. पण माझ्या आई-वडिलांनी मला फार चांगले संस्कार दिले आणि त्यांनी मला कुठल्या गोष्टीपासून थांबवलं नाही. ज्या गोष्टींमध्ये माझे मन रमायचे मी ते सर्व करायचो. त्यामुळे माझ्या वाटचालीत कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तुला जे हवं ते कर आणि पुढेही करत राहा, पुढेही करत राहा असा पाठिंबा आणि विश्वास कुटुंबीयांनी दिला. त्यामुळे मी माझ्या आवडीनं जीवन जगू लागलो,” असं किरण सांगतात.
मी रडत बसलो नाही
किरण पुढे सांगतात की, “माझे अपंगत्व फार अनपेक्षित होते. कारण माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये कोणीही अपंग व्यक्ती नव्हती. त्यामुळे आई-वडिलांसाठी हा फार मोठा धक्का होता. पण मला तर कळतच नव्हतं. जेव्हा मी जाणता झालो, तेव्हा मला वाटलं की आपण इतरांसारखे नाही आहोत किंवा दिव्यांग आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येणार नाही. पण मी रडत बसलो नाही. मला या सगळ्या सीमा ओलांडून पुढे जायचं होतं. त्यामुळे मी माझ्या व्यक्तिमत्त्वावर मेहनत केली. शिक्षण घेतलं आणि माझ्या कलेच्या रूपाने आज मला मान सन्मान मिळतोय, याचा फार आनंद आहे.”