कोल्हापूर : वय फक्त एक नंबर असतो, असं आपण अनेकदा बोलतो. त्यातून शिक्षणालाही वयाचे बंधन नसते. आपण आपल्या आवडत्या विषयात कधीही शिक्षण घेऊ शकतो. अशावेळी गरज असते ती फक्त जिद्दीची... हेच कोल्हापूरकरांच्या लाडक्या आर आर तात्यांनी सिध्द करून दाखवलंय.. तर झालं असं.. की नुकतंच आर आर तात्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी निवृत्तीनंतर एलएलबी डिग्री मिळवली.. विशेष म्हणजे ते गेल्या 35 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते.. त्यांच्या कार्यकाळात दोन राष्ट्रपती पदके.. पोलीस महासंचालक पदक आणि 771 विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय.
advertisement
भाऊ आर आर आबा मंत्री, वहिनी आमदार आणि लाभलेला घरचा मोठा राजकीय वारसा.. तरीही कोणताही बडेजाव न करता जसं पोलीस दलात आपलं प्रामाणिक पणे सेवा देण्याचं कर्तव्य पार पाडलं अगदी तसंच त्यांनी निवृत्तीनंतर वयाच्या 63 व्या वर्षी एलएलबी शिक्षण जिद्दीनं पूर्ण केलं. कोल्हापूरचे आर आर तात्या म्हणजे प्रचंड जिद्दी संयमी आणि नियमांचं काटेकोर पालन करणारं व्यक्तिमत्व.. नेहमी काहीतरी शिकत राहायचं असा जणू त्यांनी निश्चयच केलाय.. आत्तापर्यंतचा त्यांचा पोलीस दलातील कार्यकाळाचा प्रवास कोल्हापूरकरांना माहीतच आहे.. पण निवृत्तीनंतरचा त्यांचा शैक्षणिक प्रवास आपण जाणून घेणार आहोत. यासाठी लोकल18 ने खास आर आर तात्या म्हणजेच राजाराम रामराव पाटील यांच्याशी विशेष बातचीत केलीय.
डॉक्टरसाहेब लयभारी! वैद्यकीय सेवेसोबत जपतायत सामाजिक बांधिलकी, पाहा Video
गावातच झालं शिक्षण
महाराष्ट्र पोलीस दलात 1987 मध्ये आर आर तात्या फौजदार म्हणून रुजू झाले. त्यावेळी ते एमपीएससीचा अभ्यास देखील करत होते. त्याचवेळी आर आर पाटील म्हणजेच आर आर आबा राजकारणाचे धडे गिरवत होते. एक भाऊ फौजदार आणि दुसरा जिल्हा परिषद सदस्य असा अनुभव तासगाव तालुक्यातील अंजनी या गावाने त्यावेळी घेतला. अंजनी सारख्या एका छोट्या गावात दोन्ही बंधूंच शालेय आणि माध्यमिक शिक्षण झालं. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर फौजदार सहाय्यक निरीक्षक आणि निरीक्षक अशा पदांवर त्यांनी सेवा केली. तर दुसरीकडे राजकारणात जिल्हा परिषद सदस्य आमदार मंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत आबांनी गवसणी घातली.
घरातच माझा आदर्श
एका सामान्य शेतकरी कुटुंबात आर आर पाटील बंधूंनी जन्म घेतला होता. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आई-वडिलांबरोबरच कधीकाळी त्यांनी देखील मोलमजुरी केली होती. प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर दोघांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. यावेळी लोकल 18 शी बोलताना त्यांनी माझा भाऊ म्हणजेच आबा जिल्हा परिषद सदस्य, आमदार, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. हेच माझे आदर्श आहेत. माझं काम मलाच करावं लागणार अशी शिकवण मला घरातच मिळाली असं त्यांनी सांगितलं.
लोकांनी हिणवलं, पण तिनं व्रत सोडलं नाही, मुंबईतल्या ‘ॲनिमल मॉम’ची कहाणी
शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती..
पोलीस दलात येण्यापूर्वी आर आर तात्यांना कायद्याचं शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी 1985 रोजी ॲडमिशन ही घेतलं होतं. मात्र त्यावेळी शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्याने ते शिक्षण तात्यांना घेता आलं नाही. मात्र 35 वर्ष पोलीस दलामध्ये सेवा बजावल्यावर निवृत्त झालेल्या तात्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. तसेच इथून पुढेही शिक्षण घेत राहीन, असा संकल्पच त्यांनी केला आहे.
एकदा बसलो की बसलोच त्यामुळं..
निवृत्तीनंतर आर आर तात्यांना कायद्याचं शिक्षण घेण्याची इच्छा होती. नातेवाईक आणि घरच्या मंडळींपुढे त्यांनी ती व्यक्त केली होती. आपल्या कार्यकाळात रात्रंदिवस केलेल्या सेवेनंतर त्यांनी आता थोडी विश्रांती घ्यावी असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, आता आपण बसायचं नाही. एकदा बसलो की बसलोच. त्यामुळं शिक्षण सोडायचं नाही. काही ना काही तरी शिकतच राहायचं, असा त्यांनी निश्चय केला आहे. तसेच तरुणांनी देखील याच निश्चयानं सतत कार्यरत राहिलं पाहिजे, असा सल्ला देखील आर आर तात्या नव्या पिढीला देतात.





