सोलापूर : नुकतेच 2 दिवसांचे राज्यस्तरीय किन्नर संमेलनाचे पहिल्यांदाच सोलापुरात आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित संमेलनात अनेक तृतीयपंथींनी आपल्या संघर्षाच्या गाथा मांडल्या. मूळचे नंदुरबार येथील विजया वसावे यांनी देखील आपल्या संघर्षाची कहाणी मांडली. यावेळी एका तृतीयपंथीचा फॉरेस्ट ऑफिसर होण्यापर्यंतचा प्रवास आणि संघर्ष पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. एखाद्या तृतीयपंथीचा अस्तित्वाचा संघर्ष किती जीवघेणा असून शकतो? हे लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
विजया वसावे या मूळच्या नंदुरबारमधील असून महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर वनरक्षक आहेत. किन्नर संमेलनात विजया यांनी आपल्या जीवनाची संघर्ष कहाणी मांडली. विजया लहान असतानाच आईचं निधन झालं होतं. लहानपणापासूनच मुलगी असल्यासारखं वाटत होतं. पण एका मुलांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण झालं. बऱ्याचदा अवघडल्यासारखं व्हायचं. पेपर लिहिताना देखील त्रास व्हायचा. परंतु, परस्थितीला सामोरं जाण्याशिवाय तेव्हा पर्याय नव्हता, असं विजया सांगतात.
देशासाठी 17 पदकं जिकंली, पोटासाठी चालवतात कॅब, मराठमोळ्या खेळाडूवर का आली ही वेळ?
अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष
चारचौघांसारखं आयुष्य मिळावं अशी किमान अपेक्षा असतानासुद्धा स्वत:ची ओळख हाच गुन्हा ठरत होता. अशा भोवतालामधे विजया पूर्वाश्रमीचा विजय स्वतःची नेमकी ओळख मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टांमधून जात होता. साध्यासरळ जगण्यालाही पारख्या झालेल्या विजयाने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केला. अस्तित्वाचा संघर्षच जीवघेणा होता, असं विजया सांगतात.
मोठी स्वप्ने पाहा
आत्मविश्वास, धैर्य, चिकाटीला जगातील कुठलीच गोष्ट हिरावून घेऊ शकत नाही. जे काही करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल, धाडसाने त्याची अंमलबजावणी करा. तुम्हाला माहीतच असेल की, धाडसामध्ये शक्ती आहे. धाडसामध्ये जादू आहे. नेहमी मोठमोठी स्वप्ने पाहा. कारण मोठ्या स्वप्नांमुळे आपल्यामध्ये महत्त्वाकांक्षा, चिकाटी येते. असं मत विजया वसावे यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित केलेल्या तृतीयपंथी संमेलनात त्यांनी व्यक्त केले.





