राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या माध्यमातून इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रांमध्ये (renovation construction) मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये प्लास्टरिंग काम 1000 जागा, सिरॅमिक टाइलिंग 1000 जागा, ड्रायवॉल कामगार 300 जागा, मेसन 300 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
advertisement
भारत सरकार आणि इस्रायल सरकार यांच्यात झालेल्या करारा अंतर्गत हे सर्व रोजगार इस्रायलमधील नॉन वॉर झोन भागांमध्ये असतील. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर संगीता खंदारे यांनी केले आहे.
परदेशात नोकरीसाठी लागणारी पात्रता व अट
इस्रायलमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 50 असावे. इंग्रजी भाषेचे ज्ञान असणारे उमेदवार पात्र आहेत. किमान बांधकाम व नूतनीकरण (renovation construction) या क्षेत्रामध्ये तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्रायलमध्ये सध्या काम करत नसावे किंवा रहिवासी नसावे, अशी अट आहे.
अर्ज प्रक्रिया
इस्रायलमध्ये काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ‘Maharashtra International portal’ पोर्टलवर जावे. त्या ठिकाणी लेटेस्ट जॉब या विभागात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. महाराष्ट्र शासनाकडून उमेदवाराची निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, पासपोर्ट, व्हिसा प्रक्रिया, मेडिकल विमा तसेच राहण्याची व जेवणाची सोय यासह इस्रायलमधील सुरुवातीच्या काळात आवश्यक सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही खंदारे यांनी म्हटले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 31 हजार रुपये पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी ही माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन देखील संगीता खंदारे यांनी केले आहे.






