मुंबई : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची (UPSC, MPSC Exam) तयारी करायची असेल तर नामांकित संस्थेतून प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे असं अनेकांना वाटते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर, उत्तम यश मिळतं यात काही शंका नाहीच. परंतु आपण स्वतः व्यवस्थित नियोजन करूनही उत्कृष्ट यश मिळवणारे विद्यार्थीही आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नेमका करावा कसा जाणून घेऊया प्राध्यापक संजय मोरे यांच्याकडून...
advertisement
अनेकजण पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा (MPSC, UPSC) अभ्यास सुरू करतात. परिणामी संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्यायलाच पहिले सहा महिने जातात. त्यामुळे तुम्ही आधीच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. मात्र, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतेवेळी पदवीकडे दुर्लक्षा होता कामा नये हे लक्षात असूद्या.
अभ्यासक्रम समजून घेणं महत्त्वाचं
कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला व्यवस्थित माहित असायला हवा. जर अभ्यासक्रम माहित नसेल तर काय वाचावं आणि काय वाचू नये हाच गोंधळ होतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी जाहिरात आहे, त्यानुसार या अभ्यासक्रमात सात मुद्दे आहेत.
प्रश्नांचे स्वरूप
अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर आधीच्या प्रश्नपत्रिका चालणं आवश्यक आहे. या प्रश्नपत्रिका नुसत्या चाळायच्या नाही, तर त्यांचा बारकाईने अभ्यास करायचा. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न असतात याचा अंदाज येईल. शिवाय आयोग कसे प्रश्न विचारते हेसुद्धा समजेल. मागील 3 ते 4 वर्षात आयोगाने कशावर फोकस केलाय म्हणजेच ट्रेंड काय आहे? हे आपल्याला समजतं.
पुस्तकं
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी काही महत्त्वाची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. अगदी इयत्ता चौथीपासून इयत्ता बारावीपर्यंतची स्टेट बोर्डाची क्रमिक पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवी. त्यात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान या विषयांचा समावेश असतो. हे वाचून झाल्यावर इयत्ता सहावी ते इयत्ता बारावीपर्यंतची एनसीईआरटीची क्रमिक पुस्तकं वाचा. याशिवाय प्रत्येक विषयासाठी काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ असतात त्यातील काही निवडक पुस्तकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे.
वर्तमानपत्र
चालू घडामोडी हा विषय आपल्याला समजून घेण्यासाठी दररोज एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची संख्या ही कायम जास्त असते. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आयोगाचा भर जास्त असतो. आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्याच्याशी निगडित चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. चर्चेतील व्यक्ती, पुरस्कार, संस्था आणि त्यांची कार्ये या सर्वांवर आयोगाचं लक्ष असते.
वेळेचं नियोजन
अभ्यासाचं नियोजन करताना मी माझा अभ्यासक्रम किती दिवसात पूर्ण करेन, किती महिन्यात पूर्ण करेन, माझं आठवड्याचं टार्गेट काय, माझं महिन्याभराचं टार्गेट काय, सहा महिन्यांचं टार्गेट काय? याचं नियोजन हे अभ्यासाच्या सुरुवातीलच तुमच्याकडे तयार पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तयार केलेल्या वेळापत्रकाचं प्रामाणिकपणे पालन करावं. स्वतःला कायम सकारात्मक ऊर्जा देत राहा. सातत्य हेच यशाच रहस्य आहे, हे लक्षात असूद्या.





