फरीदखाँ पठाण असं हत्या झालेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. तो शुक्रवारपासून बेपत्ता होता. फरीद बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईनं मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी बासंबा शिवारात एक मृतदेह स्थानिकांना आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस पथक घटना स्थळी रवाना झालं.
advertisement
यावेळी पोलिसांनी फरीदचा मृतदेह आढळून आला. त्याचं डोकं दगडाने ठेचलं होतं. मृतदेहाच्या बाजुला रक्ताने माखलेला मोठा दगड पडला होता. शिवाय तिथे एक लाकडी दांडा देखील होता. यावेळी फरीदची हत्याच झाल्याचं आधीपासून निष्पन्न झालं. पण त्याचा चेहरा दगडाने ठेचल्याने लवकर ओळख पटत नव्हती. पण शुक्रवारी फरीदच्या आईनं मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी फरीदच्या आईला घटनास्थळी आणलं, यावेळी तो मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याचं फरीदच्या आईनं सांगितलं.
या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, फरीद एका पोरीसोबत बोलण्यात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून दोन जणांनी त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी तरुणाचं परिसरातील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र त्यात फरीद अडथळा ठरत होता. याच कारणातून आरोपीनं फरीदला संपवण्याचा कट रचला. त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने फरीदची हत्या केली. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.