या प्रकरणी पीडितेच्या आईनं अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
आरिफ मेश्राम असं अटक केलेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो भंडारा तालुक्यातील कवडसी या गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरिफ याची पवनी तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्री होती. घटनेच्या दिवशी त्याने पीडितेला भेटायला भंडाऱ्यात बोलावलं होतं. पीडित मुलगी भेटायला येताच आरोपीनं तिला स्वतःच्या घरी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
त्यानंतर आरोपीनं अल्पवयीन मुलीला भंडारा बस स्थानकावर सोडून तिथून पळ काढला. अत्याचारानंतर पीडित मुलगी घरी गेली, तिने सर्व हकीकत आईला सांगितली. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.