पाच लाखांसाठी सासरमध्ये छळ
अहिल्यानगरमधील नायगाव (ता. आमखेड) येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत घर बांधण्यासाठी आणि विहीर खोदण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याच्या सततच्या दबावामुळे विवाहितेने दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (8 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रूपाली नाना उगले (25), मुलगा समर्थ (6) आणि मुलगी साक्षी (4) यांचा समावेश आहे.
advertisement
या प्रकरणी रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी रूपालीचा पती नाना प्रकाश उगले, सासरा प्रकाश पंढरीनाथ उगले, नणंद मनीषा शिवाजी टाळके आणि तिचा पती शिवाजी गोरख टाळके यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
लग्नानंतर दीड वर्षांपासून छळ...
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विवाहानंतर दीड वर्षांपासून रूपालीवर मानसिक आणि आर्थिक छळ सुरू होता. सुरुवातीला पती नाना उगले याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम रूपालीच्या वडिलांनी भागवली. मात्र, त्यानंतरही त्रास कमी झाला नाही. नणंद मनीषा टाळके आणि तिचा पती शिवाजी टाळके यांनी घर बांधण्यासाठी आणि विहीर खोदण्यासाठी पुन्हा पाच लाख रुपये माहेराहून आणण्याचा दबाव टाकत तिचा मानसिक छळ सुरूच ठेवला.
सततच्या या छळामुळे नैराश्येत गेलेल्या रूपालीने अखेर टोकाचा निर्णय घेतला. शुक्रवारी संध्याकाळी तिने आपल्या दोन निरागस मुलांसह गावातील विहिरीत उडी मारून जीव दिला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे. दहेजविषयक छळामुळे पुन्हा एकदा तीन निरपराध जीव अकाली हिरावले गेल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे.