परळी तालुक्यातील अस्वलांबा शिवारात शनिवारी पहाटे परप्रांतीय 20 वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तरुणीच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
अन् घात झाला, नराधमांनी तोडले लचके....
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुंबईहून हैदराबादकडे रेल्वेने प्रवास करत होती. परळी रेल्वे स्थानकावर उतरून ती जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेली. तेथे तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची तिच्यावर नजर पडली. संवाद साधत तिने मुलीच्या अडचणी जाणून घेतल्या आणि काम देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पूजा हिने सतीश मुंडे व मोहसीन पठाण या दोघांना बोलावले
तिघांनी पीडितेला मोटरसायकलवर बसवून अस्वलांबा गावातील भागवत कांदे यांच्या ठिकाणी नेले. तेथे सतीश, मोहसीन व भागवत या तिघांनी तरुणीवर अमानुष अत्याचार केला. घटनेची माहिती एका नागरिकाने डायल 112 वर दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सतीश मुंडे, मोहसीन पठाण व भागवत कांदे यांना ताब्यात घेतले. तृतीयपंथी पूजा गुट्टे फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
पूजाने पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. काम देण्याचे पूजाने पीडितेला आमिष दाखवले. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर ते तिघे पीडितेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत मारहाण केली. त्यानंतर या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याकामी पूजाने त्यांना मदत केली.