वाल्मिक कराडसह बीडमधील काही कुख्यात गुंड बीडच्या तुरुंगात आहेत. मात्र, या तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्याने चक्क मोबाईल फोन अंतर्वस्त्रात लपवून ठेवला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या रफीक खुर्शीद सय्यद (रा. माजलगाव) या आरोपीकडून मोबाईल हस्तगत झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच कारागृहात दुसऱ्या एका कैद्याजवळ गांजाचे पुडे सापडले होते. या सलग घडणाऱ्या घटना कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.
advertisement
प्राप्त माहितीनुसार, रफीक सय्यद माजलगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक होऊन जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ मध्ये न्यायालयीन कोठडीत होता. दिनांक २२ जुलै रोजी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कारागृहातील पोलिस गोविंद भालेराव व रामअप्पा परळकर यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल लपवलेला असल्याचे उघडकीस आले.
या प्रकारानंतर कारागृह प्रशासन सतर्क झालं असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भालेराव यांच्या फिर्यादीवरून रफीक सय्यदविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कारागृहातील दुसऱ्या एका कैद्याच्या अंगझडतीत गांजाचे पुडे सापडले होते. या सलग घडणाऱ्या सुरक्षाभंगाच्या घटनांनी जिल्हा कारागृहातील यंत्रणा गोंधळात सापडली आहे. कैद्यांकडून मोबाईल आणि अंमली पदार्थ आत आणले जात असतील, तर त्यामागे कोणाचा हात आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
