बीड जिल्ह्यातील गेवराई येथे असलेल्या छत्रपती मल्टीस्टेट या पतसंस्थेत ठेवी परत न मिळाल्याने सुरेश आत्माराम जाधव यांनी स्वतःच्याच जीवनाचा अंत केला. विशेष म्हणजे, ही आत्महत्या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरच गळफास लावून करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कष्टाची कमाई, पण मागणी करूनही देण्यास टाळाटाळ
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्थेत अंदाजे 11 लाख रुपये ठेवले होते. त्याशिवाय, ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी ही रक्कम परत मिळवण्यासाठी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, संस्थेकडून सातत्याने टाळाटाळच केली गेली. मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली रक्कम मिळाली नाही. वारंवार विनवण्या करूनही बँक व्यवस्थापनाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते मानसिक तणावात होते.
advertisement
या तणावातूनच जाधव यांनी रात्री पतसंस्थेच्या गेटवर गळफास घेतला. या घटनेनंतर खळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पतसंस्थेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
> संतोष भंडारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत गेवराई पोलीस ठाण्यात छत्रपती मल्टीस्टेटचे अध्यक्ष संतोष भंडारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश जाधव यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
> पतसंस्थांवरील विश्वास ढासळतोय
या प्रकरणामुळे सहकारी पतसंस्थांच्या पारदर्शकतेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्थिक गुंतवणूक करूनही परतावा न मिळाल्याने अनेक ठेवीदार त्रस्त झाले आहेत.
