मिळालेल्या माहितीनुसार, मृत आश्रुबा जाधव हे केज शहरातील रहिवासी होते. त्यांची पत्नी मनिषा जाधव हिचे मागील एक वर्षापासून मयूर प्रताप पाटील देशमुख या युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. परिस्थिती इतकी गंभीर बनली की मनिषा जाधव ही आपल्या दोन मुलांसह प्रियकरासोबत धारूर रोड परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, आश्रुबा जाधव हे पत्नी राहत असलेल्या त्या खोलीवर गेले असता, पत्नी मनिषा जाधव व तिचा प्रियकर मयूर देशमुख यांनी त्यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केली. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांना तेथून हाकलून देण्यात आले, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे आश्रुबा जाधव मानसिकदृष्ट्या अधिकच खचले होते.
या सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि कौटुंबिक तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने आश्रुबा जाधव यांनी केज शहरातील हाउसिंग कॉलनीतील आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना केज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचे भाऊ युवराज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात मयूर प्रताप पाटील देशमुख, मनिषा जाधव आणि सासू मंगल भारत खाडे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.






