संगिता बावणे असं हल्ला झालेल्या ४० वर्षीय महिलेचं नाव आहे. काही काळापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. तेव्हापासून त्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र नात्याने दीर लागणाऱ्या एका विकृताने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीनं धारदार चाकुने वार करत त्यांना गंभीर जखमी केलं. ही घटना भंडाऱ्याच्या टाकळी परिसरातील भगतसिंग वार्डात घडली.
advertisement
मोकळ्या मैदानात हा हल्ला झाला होता. त्यामुळे परिसरातील काही नागरिकांनी महिलेची मदत करत नराधमाच्या तावडीतून तिची सुटका केली. यामुळे पीडितेचा जीव वाचला. मात्र, यात ती महिला गंभीर जखमी झाल्यानं तिच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सध्या ती धोक्याबाहेर असल्याची माहिती भंडारा पोलिसांनी दिली. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ एकानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. आता तो आता प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील दृश्य विचलित करणारी आहेत. त्यामुळे न्यूज १८ लोकमत घटनेचा व्हिडीओ पब्लिश करत नाही.
घटनेनंतर आरोपी इसम घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून व्हिडीओच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे. घटनेतील जखमी महिलेचा तो दूरच्या नात्यातील दीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. आरोपीच्या अटकेनंतरच या घटनेचं रहस्य समोर येईल. पण एका विधवा महिलेवर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.