पुणे: गेल्या काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पहिला मिळतं आहे. टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून तसेच नागरिकांना विविध आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. विशेषत: बँकेकडून कर्ज मिळवून देतो, त्यासाठी केवळ थोडीशी रक्कम भरावी लागेल, अशा पद्धतीने अनेकांची आर्थिक लूट केली जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
advertisement
व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देतो, असे भासवून एका व्यक्तीची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात 3 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आदित्य मोहन रेळेकर (रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे- सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज- कोंढवा रस्ता) आणि श्रीनिवास पांडुरंग बकरे (रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) यांचा समावेश आहे.
तब्बल 51 लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली व्यक्ती ही व्यावसायिक असून शुक्रवार पेठेत त्याचं दुकान आहे. या व्यावसायिकांची आरोपींशी गेल्या वर्षी ओळख झाली होती. वर्षभराच्या काळात आरोपींनी फसवणूक झालेल्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला आणि त्यांना व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्ज मंजुरीसाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोपींनी अनेक वेळा असे एकूण 51 लाख रुपये घेतले. 51 लाख घेऊन सुद्धा कर्ज मिळतं नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
