छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात घडलेल्या या घटनेत महेश दत्तात्रय पवार (वय 23, रा. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसर) हा तरुण गोळी लागून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गोळी झाडणारा अझहर शफी सय्यद (वय 40, रा. अन्सार कॉलनी, सरोज स्कूलशेजारी, पडेगाव) याला वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. अझहरकडील पिस्तूल आणि त्यातील 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
advertisement
जिद्दीनं व्यवसाय उभारला, पण विश्वासू माणसांनीच दगा दिला, तरुणी थेट रुग्णालयात!
नेमके काय घडले?
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता त्या कर्तव्यावर असताना घाटी पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार ए. आर. खिल्लारे यांनी माहिती दिली की, गोळी लागलेल्या अवस्थेत महेश पवारला अझहर सय्यद याने घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. अझहरने डॉक्टरांना सांगितले होते की, दोघेही रात्री सव्वा अकराच्या सुमारास लिंबेजळगाव टोलनाका ते वाळूजदरम्यान ढोरेगाव फाट्याजवळून मोटारसायकलने जात असताना अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आणि त्यात मित्राला गोळी लागली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी घाटी पोलीस चौकीला माहिती दिली. त्यानंतर वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे, पोलीस अंमलदार गफ्फार शेख, राजपूत यांचे पथक घाटी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी जखमी जबाब देण्याच्या स्थितीत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी महेश व अझहर यांची चौकशी केली. मात्र, दोघांकडूनही विसंगत व उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.
पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्या लक्षात हा बनाव आला. दोघेही काहीतरी लपवत असल्याचा संशय बळावल्याने अझहरला वाळूज पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
चौकशीत सत्य उघड
पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे आणि पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांनी अझहरची सखोल चौकशी केली. त्यावेळी अझहरने कबुली दिली की, त्याच्या मृत भाऊ इम्रान सय्यद याने आणलेले पिस्तूल व त्यातील 4 राऊंड तो सोबत घेऊन फिरत होता. वाळूज येथील शिवराई फाटा परिसरात, सपना हॉटेलशेजारील मोकळ्या जागेत तो आणि महेश बसले असताना पिस्तूल पाहत असताना चुकून गोळी सुटली. ही गोळी महेशच्या उजव्या पायाच्या मांडीत घुसली.
घाबरल्याने त्यानेच महेशला घाटी रुग्णालयात दाखल केले आणि नंतर गोळीबाराची खोटी कथा रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अझहरच्या पडेगाव येथील घराची झडती घेतली. घराबाहेरील निळ्या ड्रममध्ये सुमारे 30 हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि त्यातील 3 हजार रुपये किमतीची 3 जिवंत काडतुसे मिळून आली. ती सर्व शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
या घटनेमुळे बेकायदेशीर शस्त्र खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांच्यासह सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे करीत आहेत.






